दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
दुसऱ्यावर टीका करणे,फार सोपे असते…
सत्तेच्या बाहेर असताना आपण सत्ताधाऱ्यांवर वारेमाप टीका करू शकतो,पण सत्तेत आल्यानंतर जनतेच्या समस्या व प्रश्न सोडवणे,किती कठीण असते.याचा प्रत्यय वसई तालुक्यातील नवनिर्वाचित आमदार व खासदारांना पावलोपावली घ्यावा लागत आहे.एखाद्यावर टीका करणे फार सोपे असते.” उचलली जीभ लावली टाळ्याला,” असा हा प्रकार असतो.प्रत्यक्षात काम करताना मार्गातील खाचखळग्यात पडून किती रक्तबंबाळ व्हावे लागते,याचा पुरेपूर अनुभव सध्या वसई तालुक्यातील लोकप्रतिनिधींना घ्यावा लागत आहे.
वसई तालुक्यातील नालासोपारा शहरातील विजयालक्ष्मी नगर येथील ४१ इमारतीवर सध्या महानगरपालिकेतर्फे तोडक कारवाई सुरू आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी या ४१ इमारती निष्कासित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केले होते.पण ही कारवाई झाल्यास त्याचा आपल्या मतांवर परिणाम होईल,म्हणून या नवनिर्वाचित आमदार व खासदारांनी आपले वजन वापरून मनपा आयुक्तांकडून या कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळवली होती.त्यावेळी या
लोकप्रतिनिधींनी या इमारतीमधील सुमारे चारशे ते पाचशे कुटुंबाना आम्ही ही कारवाई होऊ देणार नाही.या इमारती तोडण्यात येणार नाहीत,अशी तोंडभरून आश्वासने दिली होती.पण ही सारी आश्वासने हवेवरील होती,याचा अनुभव या पीडित रहिवाश्यांना आता आला आहे.गेल्या तीन दिवसांपासून मनपा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत,या इमारती जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे रहिवाश्यानी स्थानिक आमदाराला जाब विचारला,त्यावर आमदार महाशयांनी सदर बाब न्यायालयात असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही,असे सांगत हात वर केले.पण आपल्याला फसवण्यात आले,हे लक्षात आल्यामुळे रहिवाश्यांचा संताप अनावर झाला.त्यामुळे भयभीत झालेले हे आमदार व खासदार काल पुन्हा घटनास्थळी आले व त्यांनी ” या परिस्थितीवर नक्कीच तोडगा काढण्यात येईल,लोकांचे नुकसान होऊ देणार नाही,ही बांधकामे वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे ” त्यांनी सांगितले.पण एकीकडे महानगरपालिका प्रशासन वेगाने इमारती जमीनदोस्त करत असताना ही मंडळी बांधकामे कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचवणारच सांगतात,हे लॉजिक सर्वसामान्य माणसाच्या आकलना पलीकडचे आहे.वास्तविक गेल्या दोन महिन्यात त्यांनी आपल्या सरकारकडे,आपण काय प्रयत्न केले,या कारवाईला न्यायालयातून स्थगिती मिळावी,यासाठी सरकारकडून काय हालचाली झाल्या,हे त्यांनी सांगायला हवे होते.पण त्यांनी केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानली.या सर्व घडामोडीवरून एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे विरोधात असताना आपण इतरांवर चौफेर टीका करू शकतो,पण सत्तेत आल्यानंतर कशी फटफजिती होते,अडथळ्यांची शर्यत कशी नशिबी येते व सरकारी कामकाज करताना वाटेत असलेल्या खाचखळग्यात पडून रक्तबंबाळ कसं व्हायला होते,याचा पुरेपूर अनुभव या लोकप्रतिनिधींना आता पावलोपावली घ्यावा लागत आहे.

