दीपक मोहिते,
पालकमंत्रिपदाचे घोडं अखेर गंगेत न्हालं….
अखेर पालकमंत्र्यांचे घोडं गंगेत न्हालं,सर्वप्रथम मंत्रिमंडळ,त्यानंतर मंत्र्यांचा
शपथविधी,खातेवाटप व आता पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार,या तिघांची चांगलीच दमछाक झाली.अशावेळी बीडहत्या प्रकरण घडले त्यामुळे पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहोचला होता.पुणे,रायगड व बीड या तीन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कसा सोडवायचा ? असा यक्षप्रश्न फडणवीस सरकारसमोर उभा ठाकला होता.
काल या तिघांनी या यादीवर अखेरचा हात फिरवला व ती प्रसिद्धीस दिली.पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी स्विकारली आहे.पुण्यासाठी चंद्रकांत पाटील हे इच्छुक होते,पण त्यांच्याकडे सांगलीची धुरा सोपवण्यात आली आहे.बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना देण्यात येऊ नये,यासाठी बीडवासीयांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते.तो प्रयत्न यशस्वी ठरला व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी आता सूत्रे हाती घेतली आहेत.रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून फड चांगलाच रंगला होता.या जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी पुन्हा अदिती तटकरे यांची वर्णी लागली आहे.येथे एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले जोरदार प्रयत्न करत होते.पण ते यशस्वी ठरू शकले नाहीत.पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गणेश नाईक यांची वर्णी लागली आहे.यापूर्वी गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे.( सध्याचा पालघर जिल्ह्याचा त्यावेळी ठाणे जिल्ह्यात समावेश होता )
या सर्व गदारोळात दादा भुसे,दत्तात्रय भरणे,धनंजय मुंडे,या तीघांच्या नावाचा विचार झाला नाही.नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आली आहे.एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे व मुंबई येथील शहर,अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड,चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर व अमरावती,असे या तिघांकडे प्रत्येकी दोन जिल्हे सोपवण्यात आले आहेत.एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक दादा भुसे यांना डावलण्यात आल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तर गेल्यावेळी पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांच्यावर सहपालकमंत्री म्हणून काम करण्याची नामुष्की ओढवली आहे.

