दीपक मोहिते,
पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहॆ ,ते पुन्हा माघारी फिरणे शक्य नाही,
आम्ही राज्यातील महाविकास आघाडी व राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीला लवकरच टाळे लागेल,असे भाकीत केले होते.ते आता खरे ठरू पाहत आहे.सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले आहेत.त्यांच्या या बदलत्या भूमिकेविषयी कोणालाही आश्चर्य वाटले नाही.
कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये जे अपयश पक्षाच्या पदरात पडले,तेव्हांपासून उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.या पराभवाने पक्षांतर्गत वादही उफाळून वर आले आहेत.मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत ते आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार राजन साळवी या दोघांमध्ये झालेली खडाजंगी पक्षाला क्षती पोहोचवणारी ठरली आहे.बैठकीत राजन साळवी यांनी आपल्या पराभवाला माजी खा. विनायक राऊत हे सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप केला.त्यांच्या या आरोपानंतर उद्धव ठाकरे यांचा संताप अनावर झाला. ठाकरे यांनी साळवी यांची समजूत काढण्याऐवजी त्यांनी साळवी याना चांगलेच फैलावर घेतले.तुमच्या सांगण्यावरून मी विनायक राऊत यांची पक्षातुन हकालपट्टी करू का ? असा प्रतिप्रश्न केला.तेवढ्यावर ते थांबले नाहीत,त्यांनी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांच्या पराभवाला तुम्ही कारणीभूत आहात,असा थेट आरोप साळवी यांच्यावर केला.त्यांच्या या आरोपावर साळवी यांनी ” मी माझ्या राजापूर विधानसभा मतदारसंघात राऊत याना २१ हजार मताची आघाडी मिळवून दिली आहे,असा पलटवार करत उद्धव ठाकरे यांनी केलेला आरोप फेटाळून लावला.
साळवी यांच्यानंतरही अनेक उपनेते व विभागप्रमुखांनी पक्षातील काही नेते व उद्धव ठाकरे यांच्या अवतीभवती असणाऱ्या निकटच्या सहकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.सर्वांचे एकच म्हणणे होते की,या लोकांमुळे तुम्हाला ग्राऊंड लेव्हलवर काय घडतंय ? हे नेते सर्वसामान्य शिवसैनिकाशी कसे वागतात,हे तुमच्यापर्यंत आजवर कधीच पोहोचले नाही.किंबहुना ही मंडळी ते तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत,असे उघडपणे सांगितले.अनेकांनी पक्षाचे मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांनाही लक्ष्य केले.राऊत यांचे दिवसभर माध्यमांसमोर येऊन बेलगाम आरोपांची लाळ उठवणे,पक्षाला हानी पोहोचवणारे ठरले,असे अनेकानी बोलून दाखवले. वास्तविक उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत व राजन साळवी या दोघांची संयुक्त बैठक घेऊन दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन तोडगा काढणे गरजेचे होते.पण ते न करता,उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना खडेबोल सुनावले.ज्यावेळी नेत्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद तुटतो,त्यावेळी पक्षात अराजकाला सुरुवात होते,हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात यायला हवे होते.या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांचे जे पराभव झाले,त्यामागे हे एकमेव कारण आहे.
या सर्व घडामोडीनंतर आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्याचा पश्चाताप त्यांना होऊ लागला आहे.हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देऊन धर्मनिरपेक्षतेला कवटाळण्याचा त्यांचा निर्णय पक्षातील अनेक नेत्यांना मान्य नव्हता व तो आजही नाही.
त्यामुळे आता उद्धव ठाकरे माघारी फिरण्याच्या निर्णयाला आले आहेत.पण आता पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे,ते पुन्हा माघारी फिरणार नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक करणे,” सामना,” या मुखपत्रातून फडणवीस सरकारची भलामण करणे,या दोन बाबी लक्षात घेता उद्धव ठाकरे यांची गाडी पुन्हा हिंदुत्वाच्या रुळावर येण्याचे संकेत मिळत आहेत.पण पराभूत सैन्याला विजयी सैन्याकडून कधीच चांगली वागणूक मिळत नसते.कारण मैदानावरील त्याच्या ताकदीचा अंदाज विजयी सैन्याला आलेला असतो.सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी आघाडीपासून फारकत घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी चालवली आहे.पण भाजपशी युती करण्यासंदर्भात ” भाजपचे चाणक्य,” अशी ओळख असलेले गृहमंत्री अमित शहा,मात्र त्यांना पुन्हा सोबत घेतील,असे वाटत नाही.क्षणिक सुखासाठी घेतलेला निर्णय,हा कायम अंगलट येत असतो.हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येऊ नये,ही बाबच मुळी त्यांचे ” होत्याचे नव्हते,” करण्यास कारणीभूत ठरली आहे.

