दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कराड यांचे स्वतःहून हजर होणे,पडद्याआड नक्की काय घडले ?
वाल्मिक कराड,किती नाट्यमयरीत्या प्रकट झाला,हे काल आपण पाहिले.गेले बावीस दिवस गुन्हे अन्वेषण विभागाची ९ पथके,बीड पोलीस यांना गुंगारा देणाऱ्या कराड याने स्वतः हजर होऊन पोलीस यंत्रणा कशी सडलेली आहे,हे दाखवून दिले आहे.महाराष्ट्र पोलीस हे कितीही अट्टल गुन्हेगार असो,पण त्याच्या मोबाईलवरून लोकेशन शोधून काढतात व त्याना गजाआड करतात,असा आजवरचा अनुभव आहे.मग संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शोधून काढण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला अपयश का आले ? याची चौकशी व्हायला हवी.पोलीस यंत्रणेवर दबाव असल्याशिवाय हे होऊ शकत नाही.सायबर गुन्हेगारांना हुडकून काढण्यात महाराष्ट्र पोलिसांचा हात कोणी पकडू शकत नाही.अशा या पोलिसांना वाल्मिक कराड तब्बल बावीस दिवस सापडू शकला नाही,यावर लोकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा ? या प्रकरणी पडद्याआड काय घडले,हे बाहेर येण्याची शक्यता नाही.मात्र एक मात्र खरे की पोलिसांवर अज्ञात शक्तीचा प्रचंड दबाव होता.
कराड हजर होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी एक दिवस अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मॅरेथॉन चर्चा केली.त्यानंतर अवघ्या २४ तासात कराड महाशय,हे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात दाखल झाले.या सर्व पार्श्वभूमीवर कराड यांना दोन ते चार दिवसात जामीन मिळण्याची शक्यता आहे.कराड याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हे दाखल आहेत,पण कराड यांच्यावर नाही.त्यामुळे त्याला जामीन मिळण्यात अडचण येणार नाही.कायदा,हा पब्लिक ट्रायलला कधीही थारा देत नाही.गुन्हा घडल्यानंतर पोलीस व न्यायपालिका, गुन्हेगाराविरोधात परिस्थितीजन्य पुरावा असल्याशिवाय पोलीस गुन्हे दाखल करत नाही.त्यामुळे कराड हा लवकर बाहेर आला तर आश्चर्य वाटून घेता कामा नये.धनंजय मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली,तेंव्हाच संशयाची पाल चुकचुकली होती.त्यानंतर मुंडे यांचे जिल्ह्यातील कट्टर विरोधक सुरेश धस यांची भूमिका मवाळ झाल्याचे पहायला मिळाली.पडद्याआडून सूत्रे हलवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात कोणी पकडू शकत नाही,हे आजवर घडलेल्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे.पण हे फार काळ चालत नाही,लोक आता दुधखुळी राहिलेली नाहीत.बदलापूर बलात्कार प्रकरण,प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर व कराड प्रकरण आदी कारणांमुळे सरकारची विश्वासार्हता पार लयाला गेली आहे.

