दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
खा.सवरा यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्याबाबत पुढाकार घ्यावा,
पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस त्रासदायक तसेच धोकादायक ठरू लागला आहे.रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या,अपुऱ्या लोकल्स व विविध असुविधा,अशा कारणामुळे रेल्वे प्रवासी सध्या अग्नीदिव्यातून जात आहेत.त्यामुळे नवनिर्वाचित सर्वपक्षीय आमदारांनी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेऊन चर्चगेट-विरार-डहाणू रेल्वे प्रवाशांच्या समस्या व अडचणी संदर्भांत चर्चा करावी,अशी मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.
पालघर जिल्ह्याची लोकसंख्या आता जवसळपास तीस लाखाच्या घरात पोहोचली आहे.दहा वर्षांपूर्वी नवीन जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर सफाळे,पालघर,बोईसर,
डहाणू,या परिसरात नागरीकरणाला प्रचंड वेग आला.याच दरम्यान चर्चगेट-डहाणू उपनगरीय सेवाही कार्यान्वित झाल्यामुळे या परिसरातील लोकसंख्येत दुपट्टीने वाढ होत गेली.या सर्व भागातून दररोज लाखभर नागरिक मुंबई,ठाणे व अन्य भागात रोजगारानिमित्त ये जा करत असतात.या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात रेल्वेबोर्डाने नवीन रेक्स उपलब्ध करणे,फेऱ्या वाढवणे,विरार-डहाणू चौपदरीकरण,
चर्चगेट-विरार सहापदरीकरण इ.महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे या भागातील प्रवाश्यांना दररोज आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.काही वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्री राम नाईक यांनी या भागातील रेल्वे प्रवाशांचे सेमिनार आयोजित करून प्रवाश्यांच्या समस्या ऐकून रेल्वे अधिकाऱ्यांना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते.पण तत्कालीन वाजपेयी सरकार गडगडले व तो आराखडा बासनात गुंडाळला गेला.या मार्गावरील धोकादायक प्रवास टळावा व प्रवाश्यांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा,यासाठी आता खा.हेमंत सवरा यांनी पुढाकार घ्यावा.सर्वप्रथम रेल्वेप्रवाशांच्या संघटनांशी विचारविनिमय करावा व सेमिनार आयोजित करावे.या सेमिनारला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी याना पाचारण करावे,किंवा प्रवासी संघटनांचे पदाधिकारी व सर्वपक्षीय आमदार यांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करावी,अशी मागणी काही प्रवासी संघटनांनी केली आहे.

