दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
डहाणू निवडणूक ; अहंकार व एकाधिकारशाहीला मूठमाती देणारी,
डहाणू नगरपरीषदेच्या निवडणुकीच्या निकालाने भाजपला यापुढे जिल्ह्याच्या राजकारणात अंतर्मुख होऊन विचार करावा लागणार आहे.या नगरपरिषदेच्या निवडणुकीत २७ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या भाजपला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र तोंडावर आपटावे लागले,ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरली आहे.अहंकार व एकाधिकारशाही यांना लोकशाही व्यवस्थेत स्थान नसते,हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत रजपूत यांचा राजकीय प्रवासही विलक्षण असाच आहे.” हम करे सो कायदा,” अशा पद्धतीचे त्यांचे वागणे,पक्षाला या निवडणुकीत भारी पडले.त्यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूमध्ये हजेरी लावली होती.पण त्यांचा काडीमात्र फायदा होऊ शकला नाही.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत रजपूत यांना डहाणूच्या मातीत लोळवायचेच,असा पण करत विरोधी पक्षाची मोट बांधली.हीच मोट रजपूत यांचे आजवरच्या राजकीय कारकीर्दीला उध्वस्त करणारी ठरली.
शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी फोडणे व ऐन निवडणुकीच्या तोंडावर साधू हत्याकांडातील संशयित व्यक्तीला त्यांच्या असंख्य समर्थकांना भाजपमध्ये प्रवेश देणे,अशा दोन कारणामुळे राजपूत यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.त्यांचा अहंकार गाडण्यासाठी भाजपच्या मातृ संघटना देखील निवडणुकीच्या काळात चांगल्याच सक्रिय झाल्या होत्या.डहाणूच्या मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले,पण भाजपच्या १७ नगरसेवकांच्या गळ्यात मात्र विजयाची माळ घातली.यावरून शिंदे यांनी विरोधकांची मोट बांधली ती केवळ राजपूत यांना पराभूत करण्यासाठीच होती,यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.या निवडणुकीत शिंदे गटाचे राजू माच्छी यांनी राजपूत यांचा ४ हजार ५५ मतांनी पराभव केला.राजू माच्छी यांना १४,८१५ ( ५६.८४ % ) तर भरत राजपूत यांना १०,७६० ( ४१.२८ % ) मते मिळाली व भरत राजपूत यांच्या अहंकाराची इतिश्री झाली.साधू हत्याकांडातील संशयितांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश देण्याचा त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे संघ,विश्व हिंदू परिषद व अन्य दोन संघटना आक्रमक झाल्या व त्यांनीही राजपूत धोबीपछाड देण्याच्या कामी आपला महत्वाचा वाटा उचलला.भाजपला याची कुणकुण लागल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या प्रवेशाला स्थगिती दिली,पण तोवर वेळ निघून गेली होती.संतप्त झालेल्या मतदारांनी त्यांना अक्षरशः झिडकारले,पण इतर उमेदवारांना त्याचा फटका बसू दिला नाही.इतर निवडून आलेल्या नगरसेवकानी चांगली मते घेत विजय मिळवला.अशा प्रकारे डहाणूच्या मतदारांनी अहंकाराची लंका जाळून टाकली.यातून भाजपनेही बोध घ्यायला हवा.सध्या हवशे नवश्याना प्रवेश देण्याचे सत्र त्यांनी जिल्हाभरात राबवणे, सुरु केले आहे,ते भावी काळात त्रासदायक ठरू शकते.

