दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मतदानाच्या अगोदरची रात्र ; ” नजर हटी,तो सबकुछ फटी,”
येत्या २३ डिसें.पासून नामनिर्देशनपत्रे सादर करण्यास सुरुवात होणार आहे.ही प्रक्रिया तब्बल आठ दिवस म्हणजे ३० डिसें.पर्यंत चालणार आहे.पुढच्या वर्षी म्हणजेच २ जाने.२०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेस लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.राजकीय पक्षाच्या हाती अद्याप पंधरा दिवस आहेत.या पंधरा दिवसात जागावाटप,उमेदवारी निश्चित करणे,उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रचाराची दिशा ठरवणे व त्यानंतर निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा उभारणे,अशी कामे हातावेगळी करणे,अशा अनेक आव्हानांना राजकीय पक्षांना सामोरे जावे लागणार आहे.निवडणुकीच्या काळातील हे सारे सोपस्कार वर्षानुवर्षे अंगवळणी पडले असल्यामुळे राजकीय पक्षांना ही प्रक्रिया राबवताना कोणत्याही अडचणी येत नाहीत.
या सर्व प्रक्रियेत सोबत असलेल्या राजकीय पक्षाशी जागावाटप व योग्य उमेदवार निवड,या दोन्ही प्रक्रिया,सर्वच पक्षासाठी तापदायक अशाच असतात.समविचारी पक्षाशी जागावाटपाची चर्चा करताना प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःचे हित व फायदा यावर भर देणार,ह साहजिकच आहे.पण,त्यासाठी जी काही ओढाताण होणार आहे,त्याचा फायदा विरोधी पक्षाला होणार नाही,याविषयी त्यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.तसेच जागावाटपाचा सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर उमेदवारी न मिळालेल्या उमेदवाराकडून होणारी बंडखोरी,हा आणखी एक मनस्तापाचा विषय असून त्याला सामोरे जाताना पक्षाच्या नेत्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.अर्ज मागे घेण्याच्या दिवशी हे सारे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.प्रचारासाठी उमेदवारांना तब्बल १२ दिवस मिळत आहेत.या बारा दिवसात उमेदवारांना प्रचाराच्या किमान दोन किंवा कमाल तीन फेऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहे.वसई विरार शहर मनपाच्या प्रत्येक प्रभागात किमान ३५ हजार मतदार असून त्यांच्या भेटीगाठी घेणे,हे प्रचंड मेहनत व किचकटीचे काम आहे.पण उमेदवारांना ते पार पाडावेच लागणार आहे.अलीकडच्या काळात निवडणुकीतील उमेदवारांना आर्थिक व मनुष्यबळाची कमतरता भासत नाही,ही एक आशादायक बाब आहे.पूर्वी निवडणूक खर्चासाठी निधी कुठून आणायचा ? अशा विवंचनेत उमेदवार असायचे,आता तशी स्थिती उरली नाही.देणगी रूपाने मिळणारा पैसा उभा करण्याचे उत्तरदायित्व आता उमेदवारांच्या पक्षाने आपल्या खांद्यावर घेतले असल्यामुळे प्रचारादरम्यान उमेदवार याविषयी निवांत असतात.त्यानंतर प्रचार संपतो व उगवतो मतदानाचा दिवस,या मात्र मतदानाच्या अगोदरची रात्र ही एकतर उमेदवाराला विजयस्तंभाकडे नेणारी असते किंवा उमेदवाराला पायाखाली घेणारी असते. त्यामुळे ही रात्र उमेदवार व त्यांच्या समर्थकांना जागून काढावी लागते.” नजर हटी तो,सबकुछ फटी,” अशा भितीमुळे या मंडळींना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो.दुसरा दिवस हा मतदानाचा,दिवसभराची धावपळ व त्यानंतर संध्याकाळी श्रमपरिहार असा या सर्व प्रक्रियेचा समारोप मतमोजणीच्या दिवशी होत असतो.अनेक महिन्याची धाकधुक अखेर संपुष्टात येते.

