दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
लवकरच नवीन गिधाडे
भिरभीरू लागणार…
अखेर,काल वसई विरारकरांच्या जीवनात उशीरा का होईना,उष:कालाची चिन्हे दिसू लागली.तब्बल दहा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या उपविभागातील जनतेच्या हालअपेष्टा संपल्या,असं म्हणता येणार नाही,पण थोड्याफार कमी झाल्या,असं म्हणता येईल.वसई विरार महानगरपालिकेतील अधिकारी,नगरसेवक,
कर्मचारी व ठेकेदारांनी गेल्या दहा वर्षात महानगरपालिकेची तिजोरी घुवून पुसून साफ केली.त्यामुळे या संपूर्ण क्षेत्राची अवस्था अश्मयुगातील एका पडक्या गावासारखी झाली.तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार,नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.एस.रेड्डी व प्रभारी सहा.आयुक्त गिलसन गोंसालवीस व अन्य लोकांनी तर या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या शिखरावर नेऊन ठेवले.ही जी महानगरपालिका स्थापन झाली,ती केवळ लुटीसाठीच,असा गोड गैरसमज येथील राजकारणी,मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवर आलेले भ्रष्ट अधिकारी,आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी व गिधाडांच्या रुपात येऊन लचके तोडणारे ठेकेदार या सर्वांनी करून घेतला व गेल्या दीड दशकात जनतेच्या पैश्याची केवळ लूटच केली.त्यामुळे या उपप्रदेशात राहणारे व प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांना विकास कसा असतो ? हे अनुभवायलाच मिळाले नाही.उलट परिसर कसा भकास करता येतो,याचा अनुभव मात्र पावलोपावली घ्यावा लागला.
आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत,नवीन लोक येतील,प्रभावी प्रशासकीय कारभार आपल्याला पाहायला मिळेल,अशा भ्रमात जर करदाते असतील तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत,असे खेदाने म्हणावे लागेल.येथील राजकीय नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था,या केवळ लुटीसाठीच असतात,अशी आपली मानसिकता तयार केली आहे.त्यामुळे निवडणुकीनंतर सुराज्य येईल,अशी अपेक्षा करणे,म्हणजे दगड नव्हे तर खडकावर डोके आपटून घेण्यासारखे आहे.असो,आजवर जे काही घडले ते गंगेला मिळाले,असे समजून या निवडणुकीत करदात्यांनी डोळसपणे मतदान करायला हवे.” दगडापेक्षा वीट बरी,” असा निकष लावून जर त्यांनी मतदान केले तर अंधार – प्रकाश मिश्रित असा उष:काल आपल्या जीवनात उगवू शकेल,अशी अपेक्षा आपल्या करता येईल.पण,प्रशासकीय कामकाजात फार मोठे परिवर्तन होईल,अशी अपेक्षा बाळगणे,चुकीचे ठरेल कारण,बुद्धिबळाचा पट बदलणार असला तरी पटावरील मोहरे व प्यादी मात्र तीच राहणार आहेत.या महानगरपालिकेवर घिरट्या घालणाऱ्या गिधाडांच्या संख्येत घट होणार नाहीतर ती वाढतच जाणार आहे.

