दीपक मोहिते,
” शहाणपण,”
भाजपने स्वबळाचा हट्ट अखेर सोडला…
भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) महायुतीमधील या दोन्ही पक्षानी स्थानिक स्वराज्य समित्यांच्या आगामी निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षात उफाळलेल्या अंतर्गत मतभेदाचे पडसाद या निवडणुकीत उमटतील,असे संकेत मिळाल्यानंतर या दोन्ही पक्षांना सुचलेले हे शहाणपण आहे.दुसरीकडे महाविकास आघाडी देखील या निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे काल मुंबईत एकमेकांना भेटले व त्यांनी याविषयी प्रदीर्घ चर्चा केली.
त्यांच्या या निर्णयामुळे या निवडणुकांमध्ये विरोधकांना जो मतविभागणीचा फायदा होणार होता,आता तो होण्याची शक्यता नाही.
गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गट व भाजप या दोन्ही पक्षाचे संबंध कमालीचे ताणले गेले होते.तसेच सरकारचा गोंधळी कारभार व आमदारांची सतत बाहेर येणाऱ्या भानगडी व कुलंगडी लक्षात घेता,या निवडणुका स्वबळावर लढवणे,शक्य नसल्याचे फडणवीस यांच्या लक्षात आले व दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटीचा सिलसिला सुरू झाला.अखेर काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट झाली व या निर्णयाला मूर्तस्वरूप देण्यात आले.त्यांच्या या निर्णयामुळे या निवडणुका महाविकास आघाडीला आता अधिक अवघड होणार आहेत.पालघर जिल्ह्यातील वसई- विरार,मुंबई,ठाणे,नवी मुंबई,भिवंडी – निजामपूर,कल्याण – डोंबिवली,या महत्वाच्या महानगरपालिका आपल्या हातून जावू नयेत,यासाठी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी परीस्थितीचे भान राखत आपल्या आशा – अपेक्षांना यावेळी मुरड घातली आहे.युतीच्या माध्यमातून जर या निवडणुका आपण लढवल्या तर विरोधकांना नामोहरम करू शकतो,तसेच जर स्वबळावर लढलो तर मतविभागणीचा फायदा विरोधी पक्षाला होईल,अशा भितीमुळे भाजपला स्वबळाचा अट्टाहास सोडावा लागला.

