दीपक मोहिते,
निवडणुकीचे वेध,
दीपक मोहीते,
” हल्लाबोल,”
सवत फार काळ संसार करू शकत नाही…
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर पालघर जिल्ह्यात भाजपने ” मिशन लोटस,” ( फोडाफोडीचे राजकारण ) दररोज कोण ना,कोण तरी आपल्या मूळ पक्षाला सोडचिट्ठी देऊन भाजपच्या तंबूत स्थलांतरीत होऊ लागला आहे.पण,घाऊक पद्धतीने भाजपची वाट धरणाऱ्या या गयारामांचे राजकीय भवितव्य हमखास धोक्यात येण्याची शक्यता आहे.
वर्षानुवर्षे पक्षासाठी खस्ता खालेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याना हा सारा प्रकार म्हणजे जेवणाच्या ताटातील कडीपत्तासारखा वाटतो आणि ते साहजिकच आहे.गेली साडेचार दशके पक्षाच्या उभारणीसाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली,वेळप्रसंगी अनेक गुन्हे व न्यायालयीन खटले अंगावर घेतले.त्यांना जर जेवणाच्या ताटातील कडीपत्याप्रमाणे बाहेर टाकले जात असेल तर ते त्यांच्यावर नक्कीच अन्याय करण्यासारखे आहे.पण भाजपने २०१४ नंतर ” सत्तेसाठी कायपन,” असे साधनशुचितेला छेद देणारे धोरण स्विकारले व पक्षात हवशे नवश्याची घाऊक आवक सुरु झाली.त्यामुळे पक्षासाठी आपलं उभं आयुष्य वेचणाऱ्यांनी कायम सतरंज्या उचलायच्या का ? असा प्रश्न साहजिकच आज ना उद्या उपस्थित होणार आहे.बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यापैकी जो आपल्याला फायदेशीर ठरू शकतो याविषयी चाचपणी करण्यासाठी भाजपचे नेते निकषांची चाळणी घेऊन बसले आहेत.त्यामुळे भाजपमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला सत्तेत वाटा मिळेल,अशी शक्यता वाटत नाही.सत्तेचे असे वाटप करणे,भाजपलाही परवडणारे नाही.या अशा आयाराम व गयारामाची संभावना भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते ” संधीसाधू,” अशी करू लागले आहेत.हे सारे ” आयाराम,” हे भाजप ” आवडते,” म्हणून जवळ करत नसून,त्यांच्या मूळ पक्षाची वाताहत करण्यासाठी त्यांना आपलेसे करत आहेत.कालांतराने या सगळ्यांवर पश्चाताप करण्याची पाळी येणार आहे.कारण,सवत कधीही सुखाने संसार करू शकत नाही,आज ना उद्या भाजपमध्ये जुने – नवे,असे वाद होण्याची शक्यता आहे.पक्षाच्या या विनाशकारी धोरणाविरोधात आज कोणी बोलायला तयार नाही,पण भविष्यात काहीही घडू शकते.जाणारे आज आनंदात जात आहेत,पण हा आनंद किती काळ टिकणार आहे,हे एकहाती सरकार आणण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आकाराला येईल,तेव्हा या उंदरांची पुन्हा पळापळ सुरू होईल,पण तेंव्हा त्यांची स्थिती ” ना घरका,ना घाटका,” अशी झालेली असेल.

