दीपक मोहिते,
आम्ही वसईकर खरंच दुर्देवी,
तिघांची तोंडे तीन दिशेने ; विकासकामाना अद्याप वेग नाही…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका नजीक आल्या असून सारे राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत.नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका आटोपल्या की दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणुका होतील.त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतील. महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणपणे फेब्रु.महिन्यात होतील,असा अंदाज आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकामध्ये नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून वर्षभरात लोकहिताची किती कामे झाली ? प्रलंबित विकासकामाना चालना मिळाली का ? व लोकांच्या अपेक्षा १०० % नाही तर वर्षभरात किमान १० ते १५ % कामे झाली का याविषयचा लेखाजोगा लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे.
गेल्या डिसें.महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या.या निवडणुकीत वसई विधानसभा मतदारसंघात भाजपच्या स्नेहा दुबे पंडित,नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपचेच राजन नाईक व बोईसर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विलास तरे हे तिघे निवडून आले.या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे.या एक वर्षाच्या काळात नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या कारभाराचे विश्लेषण करणे क्रमप्राप्त ठरते.तसेच यापूर्वीचे लोकप्रतिनिधी सध्या काय करताहेत,यावरही प्रकाश टाकणे,देखील तेवढेच गरजेचे आहे.गेल्या वर्षभरात परिस्थितीत कोणताही बदल होऊ शकला नाही.लोकांनी अगोदरच्या लोकप्रतिनिधींच्या कारभाराला कंटाळून परिवर्तन घडवून आणले,पण त्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या,त्या मात्र पूर्ण होऊ शकल्या नाहीत.आजही लोकांच्या अनेक समस्या व अडचणी ” जैसे थे,” स्थितीतच आहेत.मात्र या वर्षभरात रिल्सचा चांगलाच सुळसुळाट झाल्याचे वसईकर व नालासोपारावासीयाना पहायला मिळाले.सध्या अशाप्रकारचा प्रसिद्धीचा नवा सोस उदयाला आला आहे.तो केवळ विद्यमान लोकप्रतिनिधीसह मर्यादित नसून पूर्वीच्या लोकांनाही चांगलाच जडला आहे.केवळ प्रसिध्दीच्या माध्यमातून स्वतःला मिरवायचे,असा हा प्रकार आहे.असो,वास्तविक आपल्या तालुक्यातील विकासकामे या तिन्ही आमदारांनी समन्वयाने करणे,अपेक्षित होते.पण तसे घडू शकले नाही.वर्षभराच्या काळात तिन्ही आमदारांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने असलेले पहायला मिळाले.एकाच पक्षाचे दोन आमदार व महायुतीच्या घटक पक्षाचा एक आमदार,अशा तिघांमध्ये असलेला विसंवाद,हा तिन्ही मतदारसंघाच्या मुळावर येणारा आहे आणि तो अत्यंत धोकादायक असा आहे.परिसरातील विकासकामे ही समन्वयाने होत असतात,नेमके हाच समन्वय या वर्षभरात मतदारांना पाहायला मिळाला नाही.यामागचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.सदर बाब लोकांनी केलेल्या परिवर्तनाचा अपमान करण्यासारखे आहे,आणि ते दुर्देवी आहे.आगामी काळात हे तिघे समन्वयाने करतील,अशी अपेक्षा करूया.

