दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत,
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेचे ( उबाठा ) उत्तम पिंपळे,भाजपचे कैलाश म्हात्रे व शिवसेनेचे ( शिंदे गट ) उत्तम घरत हे तिघेजण आपले नशीब अजमावत आहे. वास्तविक हे तिघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. या तिघांपैकी उत्तम घरत यांनी चारवेळा उपगराध्यक्ष तर उत्तम पिंपळे यांनी नगराध्यक्षपद भूषवले आहे.या निवडणुकीत हे तिघेही एकमेकांसमोर दंड थोपटून उभे आहेत.
त्यामुळे पालघर शहरातील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची दाट शक्यता आहे.पालघरच्या शहरी भागात शिवसेनेला वाखणण्याजोगा जनाधार होता.पण पक्षफुटीनंतर या जनाधारचे विभाजन झाले.त्याचा फायदा या निवडणुकीत भाजपला होण्याची शक्यता आहे.भाजपने,शिवसेनेच्या कैलाश म्हात्रे यांना रिंगणात उतरवून आपण या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत.भाजपने घेतलेल्या या निर्णयामुळे शिंदे गटाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.नगराध्यक्षपदासाठी उतरलेले हे तीनही उमेदवार दिग्गज नेते असल्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे.
या तिन्ही उमेदवारांची चांगली ओळख,कार्यकर्त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांची जाण लक्षात घेता निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहे.पाणी,रस्ते, ड्रेनेज,मार्केट व शहरातील वाहतूककोंडी,असे ज्वलंत प्रश्न प्रचारात कळीचे मुद्दे ठरणार आहेत.शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामधून उद्धव ठाकरे यांची शिवसेना अद्याप सावरली नसून अनेक जुने व ज्येष्ठ निष्ठावंत हे कोणाला साथ द्यावी,अशा संभ्रमात सापडले आहेत.प्रश्न निर्माण झाला आहे.
पालघर शहरातील सर्वसामान्य मतदारांची उत्सुकता या त्रिकोणी लढतीबाबत वाढली आहे.या शहराच्या नगराध्यक्षपदावर कोण विराजमान होणार ? याकडे पालघरवासियांचे लक्ष लागले आहे.

