दीपक मोहिते,
दीपक मोहिते,
पालकमंत्र्यांचे जनता दरबार व जिल्ह्याचे दौरे ; काहीही निष्पन्न होणार नाही…
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,हे गेले वर्षभर जिल्ह्याचे धावते दौरे करत आहेत.त्यांचे हे दौरे,केवळ एकप्रकारचे इव्हेंटच ठरले आहेत.दौऱ्यामागचे उद्देश तडीला जातात का ? याविषयी पालघरवासियांच्या मनात संभ्रमावस्था आहे.पण हे दौरे फार महत्वाचे आहेत,असे त्यांना वाटत असले तरी या दौऱ्याचे फलित काय ? असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर केवळ ” माहीत नाही,” असेच मिळते.
प्रशासन त्यांच्या दौऱ्यावर वारेमाप खर्च करत असते,हा पैसा खरोखरच कारणी लागतो का ? मध्यंतरी पालघर येथे झालेल्या जनता दरबाराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.आपल्या समस्यांची सोडवणूक होईल,अशी भाबडी आशा – अपेक्षा उराशी बाळगत हजारो ग्रामस्थ पदरमोड करत या जनता दरबारात आले होते.त्यानी या दरबारात त्यांचे अनेक प्रश्न व समस्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.पण,त्यांना दिलासा मिळू शकला नाही.आजही पिडीत ग्रामस्थ आपली कामे मार्गी लागावीत,यासाठी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद व अन्य शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. विविध प्रकल्पासाठी सरकारने हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत,ते बाधित शेतकरी मोबदल्यासाठी वणवण फिरत आहेत,पण पालकमंत्र्यांना त्यांची दखल घ्यावी,असे वाटत नाही.ही एकप्रकारे स्थानिक भूमिपुत्राची क्रूर चेष्टाच आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले,पण त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नच झाले नाहीत.वसई विरार भागात झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे लोकांना अनेक अडचणी व समस्याना सामोरे जावे लागत आहे.त्यावर नियंत्रण आणण्याकामी पालकमंत्र्यांनी ठोस पावले उचलण्याची गरज होती.आज या बांधकामातून कोट्यवधी रु.ची मलिदा कोण गोळा करत आहे,त्यामधील वाटा कोणाच्या पदरात पडत आहे,हे तुम्हालाही माहीत आहे.पण ” आपलेच दात,आपलेच ओठ,” या म्हणीनुसार तुम्ही पण ” तेरी भी चूप,मेरी भी चूप,” अशी भूमिका घेतली आहे.मनपा क्षेत्रात वृक्षलागवडीसाठी आलेली झाडांची रोपे,आपल्या गावी घेऊन जाणारा,हा उच्चपदस्थ अधिकारी कोण ? याचा शोध घ्या,पण ते तुमच्याकडून होणार नाही.मनपा आयुक्त व दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ईडीने कोट्यवधी रु.जप्त केले.ते दोघेही तुरुंगाची हवा खाऊन आले. यावरून महानगरपालिकेत काय चालले आहे,याची कल्पना करा.दौऱ्यात तुम्ही जिल्ह्याच्या अतिग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळांना भेटी दिल्या असत्या तर आम्ही जिल्हावासीयांनी तुम्हाला डोक्यावर घेतले असते. ग्रामीण भागातील बालमृत्यू,कुपोषण,
सर्पदंश व आदिवासी बांधवांची उपासमार,जरा नजरेखालून घाला.तुमच्याकडून जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष,मुर्दाड अधिकाऱ्यांच्या पथ्यावर पडत असून नोकरशाही चांगलीच निर्ढावली आहे.पालकमंत्री जेंव्हा नोकरशाहीच्या हातचे बाहुले होतो,तेव्हा त्या जिल्ह्यात अराजकाची स्थिती निर्माण असते,आज आपला जिल्हाही त्याच वाटेवर आहे.
त्यामुळे पालकमंत्री महोदय,तुम्हाला तमाम जिल्हावासियातर्फे विनंती आहे,हे लोकांना नको असणारे पाहणी दौरे करू नका,यातून काहीही निष्पन्न होणार नाही.ते केवळ दिखाऊ सोपस्कार आहेत.लोकांना दिलासा मिळेल,असे दौरे आखा.बंद पडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा रोखा,प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक सक्षम करा,अशी महत्वाची कामे तुमच्याकडून झाली तरच तुम्ही आमचे खरेखूरे पालक आहात,असे आम्ही समजू….

