दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भूमिपूजनाचा सुळसुळाट व पाहणी दौऱ्याचा सुकाळ,प्रत्यक्षात सर्वत्र शुकशुकाट,
गेल्या वर्षभरात वसईकर नागरिक,हे भूमिपूजनाचा सुळसुळाट व पाहणी दौऱ्याचा सुकाळ पाहून अक्षरशः कंटाळून गेले आहेत.दर दोन दिवसाने अमुक तमुक विकासकामांना देवाभाऊंनी कोट्यवधी रु.दिल्याच्या रील्स पाहून डोके अक्षरशः भणाणून गेले आहे.त्यामुळे सध्या वसईकर नागरिकांची स्थिती ” सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही,” अशी झाली आहे.
गेल्या वर्षाभरात वसई तालुक्यातील प्रलंबित विकासकामापैकी एकही विकासकाम मार्गी लागू शकले नाही,असे यापूर्वी कधीच घडले नव्हते.केवळ रील्स बनवून प्रसिद्धी माध्यमावर पोस्ट करणे,हे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासारखे आहे.आज तालुक्यातील हैराण झाली आहेत,कारण त्यांची लहानसहान कामेही वेळेवर होत नाहीत.लोकप्रतिधीनीचे साधे पत्र मिळण्यासाठी जर नागरिकांना पंधरा दिवस त्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लागत असतील,तर त्याला दुर्देवच म्हणावे लागेल.गेल्या पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेल्या प्रशासकीय राजवटीमुळे अनेक विकासकामे मार्गी लागू शकली नाहीत,त्यामुळे वसईकरांना सध्या अग्निदिव्यातून जावे लागत आहे.गेल्या वर्षी लोकांनी परिवर्तन हवे,असा अट्टाहास करत नवे लोकप्रतिनिधी निवडून दिले.नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्याला न्याय देतील,आपल्या अडचणी,समस्या व प्रलंबित प्रश्न सोडवतील,अशा अपेक्षेत असलेल्या वसईकरांवर आता अक्षरशः कपाळावर हात मारून घ्यायची पाळी आली आहे.अशीच जर परिस्थिती कायम राहिली तर वसईतील विकासकामांचा नक्कीच बोजवारा उडण्याची शक्यता आहे.रस्त्यावरील खड्डे,या खड्ड्यामुळे होणारे अपघात, अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या,वाहतूककोंडी व अन्य समस्यामुळे करदाते पार कंटाळून गेले आहेत.पूर्वी होते ते लोकप्रतिधीनिधीच बरे होते, असे म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आहे.या परिस्थितीला हेच नागरिक जबाबदार आहेत,कारण त्यांना तालुक्यात परिवर्तन हवं होतं,परिवर्तन झालं,पण ते परिवर्तन आपल्याच अंगलट येईल,असं त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.त्यामुळे देवाभाऊंनी स्वतः वसई तालुक्यात लक्ष घालणे गरजेचे आहे,अन्यथा चार वर्षानंतर पुन्हा परिवर्तन होऊ शकते.

