दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढतोय…
फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. एक दिवसाच्या या दौऱ्यात त्यांच्या चार जाहीर सभा होत आहेत.या सभेत ते आपल्या भाषणात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून महायुतीमध्ये सध्या धमासन सुरू झाले आहे.त्यास पालघर जिल्हाही अपवाद राहिला नाही.जिल्ह्यात भाजप व शिंदे गटामध्ये सख्य उरलेले नाही. शिंदे गटाच्या अनेक राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे भाजपकडून जोरदार प्रयत्न होत आहेत.त्यामुळे महायुतीचे घटक व विरोधी पक्षात चिंतेचे वातावरण पसरले आहे.गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सुमारे तीन हजार समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.परंतु त्यांच्या प्रवेशाला काही कारणामुळे स्थगिती देण्यात आली.तत्पूर्वी भाजपने शिंदे गटाचे अनेक नेते,कार्यकर्ते व समर्थकांना आपल्या जाळ्यात ओढले होते.या दोन घटनांनी सर्वच राजकीय पक्ष चिंतेत सापडले आहेत.सध्या अनेक नेत्यांना वश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये यंदा जोरदार धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढत चालला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर तो अधिक वाढणार आहे.पालघर जिल्ह्यात पालघर,डहाणू व जव्हार या तीन नगरपरिषदा आणि वाडा नगरपंचायत,अशा एकूण चार निवडणुका होत आहेत.त्यासाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.२१ नोव्हें.रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यात महायुतीच्या दोन प्रमुख पक्षात सुरू असलेली सुंदोपसंदी पाहता भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोघे या निवडणुकीत वेगवेगळ्या चुली मांडतील अशी शक्यता आहे.आश्चर्याची बाब म्हणजे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना,मनसे, राष्ट्रवादी व बहुजन विकास आघाडी हे एकत्रितपणे या निवडणुका लढवणार आहेत.या चार ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू,सोबत असलेल्या इतर घटक पक्षापेक्षा बरी आहे.पण साडेतीन वर्षांपूर्वी दुफळी झाल्यानंतर मात्र त्यांच्या पक्षाची ताकद सध्या चांगलीच कमकुवत झाली आहे.राष्ट्रवादी काँगेसची स्थिती देखील चांगलीच खालावली आहे.
पालघर नगरपरिषदेत एकूण २८ जागा आहेत.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे १४ नगरसेवक निवडून आले होते, व त्यांचे वर्चस्व निर्माण झाले होते.पण पक्ष फुटीनंतर शिंदे गटाने बाजी मारली.या नगरपरिषदेत भाजप – ०६,राष्ट्रवादी काँग्रेस – ०३, व अपक्ष – ०५,असे बलाबल निर्माण झाले होते.डहाणू नगरपरिषदेत गेल्या निवडणुकीत भाजपने २५ जागांपैकी १५ जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस -०८ व शिवसेना – ०२ यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.नगराध्यक्षपदाची माळ भाजपच्या भरत रजपुत यांच्या गळ्यात पडली.जव्हार नगरपरिषदेत शिवसेनेला सत्ता मिळाली,त्यांनी निवडणुकीत १६ पैकी ०८ जागा जिंकल्या तर भाजपला ०६ जागा मिळाल्या. त्यावेळी सेनेचे चंद्रकांत पटेल,हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते.वाडा
नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांपैकी शिवसेना – ०४,भाजप – ०६,शिंदे गट – ०२,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०२, राष्ट्रवादी काँग्रेस – ०१ व बहुजन विकास आघाडी -०१,अशी स्थिती निर्माण झाली होती.येथे बहुमत नसतानाही भाजपशी युती असल्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या गीतांजली कोलेकर यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागू शकली.जिल्ह्यातील या चार तालुक्यात होणाऱ्या निवडणुकामध्ये राजकीय पक्षाच्या ताकदीवर एक नजर टाकल्यास आगामी काळात जिल्ह्यात कशी राजकीय स्थिती असेल,याचा अंदाज येऊ शकतो.
( पालघर,डहाणू,जव्हार नगरपरिषदा व वाडा नगरपंचायत,)
भाजप – ३३,
शिवसेना – २८,
राष्ट्रवादी काँग्रेस – १२,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०२,
अपक्ष – ११,
एकूण जागा – ८६,
बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेता,भाजप व शिवसेना हे या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढल्यास या दोघांमध्ये सरळ लढत होईल.शिंदे गटाला नामोहरम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो.निवडणुकीत हे दोघे एकमेकासमोर जरी उभे ठाकले तरी निकालानंतर मात्र ते पुन्हा एकत्र येतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

