दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
जव्हारकरांची पहिली पसंती कोणाला ?
जव्हार तालुका हा आता विकासाच्या वाटेवर आहे,पण विकासाला अपेक्षेनुसार गती मिळालेले नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचे जीवन अद्याप , ” जैसे थे,” स्थितीतच आहे.रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे दरडोई उत्पन्न वाढू शकले नाही.हा तालुका निसर्गरम्य तालुका म्हणून ओळखला जातो,पण सरकारने पर्यटन दर्जा देऊन पर्यटनावर आधारित व्यवसाय निर्माण केले नाहीत.त्यामुळे आजही ग्रामीण भागात अठरापगड दारिद्र असून स्थानिक भूमिपुत्र हलाखीचे जीवन जगताहेत.सुमारे १०७ वर्षांपूर्वी सरकारने शहरात नगरपरिषद स्थापन केली.पण तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नामुळे भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत.त्याचे दुष्परिणाम स्थानिकांना आजही भोगावे लागत आहेत. पर्यटन वाढीला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असते तर हा परिसर नक्कीच नावारूपाला आला असता. अशा सर्वं परिस्थितीत या नगर परिषदेची पुढील महिन्यात निवडणुका होत आहेत.
पालघर जिल्ह्याच्या वेशीवर असलेला जव्हार तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून सध्या तो विकासाच्या वाटेवर मार्गस्थ झाला आहे.परंतु हा विकास केवळ शहरापूरती मर्यादित आहे.तालुक्याचा ग्रामीण भाग अद्याप कात टाकू शकलेला नाही.जो काही विकास झाला तो केवळ शहरी भागाचाच झाला.त्यामुळे ग्रामीण भाग अद्याप अंधारातच चाचपडत आहे.त्यामुळे त्याला नियोजनबद्ध विकास,असे आपल्याला म्हणता येणार नाही.
गेल्या २० वर्षात जव्हारच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ होत गेली.एकेकाळी ” मिनी महाबळेश्वर,अशी ओळख असलेल्या या शहराची सध्या बजबजपुरी झाल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या दोन दशकात वाढलेली लोकसंख्या,अपुरा पाणीपुरवठा,आरोग्य व वैद्यकीय सेवेचा उडालेला बोजवारा,आदी कारणामुळे या शहराचा चेहरा पार काळवंडून गेला आहे.आजही हे शहर विकासाच्या प्रतिक्षेत आहे.या तालुक्यात एकेकाळी विपुल प्रमाणात वनसंपदा होती.मात्र आज शहरातील वाढत्या बांधकामामुळे आता “ओसाड माळरान,” झाले आहे.पाणी रोजगार व आरोग्य/ वैद्यकीय सेवा,या महत्वाच्या जीवनावश्यक नागरी सोयी – सुविधांचा अभाव आहे.अशा या शहराच्या नगरपरिषदेची निवडणूक २ डिसें.रोजी होत आहे.
जव्हार नगरपरिषद ही जुन्या नगरपरिषदेपैकी एक आहे.या नगरपरिषदेची स्थापना १९१८ मध्ये झाली.जिल्ह्याच्या पूर्वेस डोंगराळ परिसरातील एक आदिवासीबहुल शहर म्हणून ते ओळखले जाते.पर्यटन व वारली चित्रकलामुळे तालुक्याला वेगळी ओळख मिळाली.निसर्गरम्य या तालुक्याचे फुफ्फुस व हृदय व्यवस्थित चालू राहावीत, यासाठी सरकारने जाणिवपूर्वक प्रयत्नच केले नाहीत.त्यामुळे या शहराला बकालपणा आला आहे.येथे मुकणे राजघराण्याची ६०० वर्षे सत्ता होती.या राजघराण्याच्या कारकिर्दीत प्रजा सुखी होती.संस्थान भारतात विलीन झाले व संपूर्ण कारभार विस्कळीत झाला.या तालुक्याचा बहुतेक भाग संह्याद्री पर्वतरांगेत वसला असून तो डोंगर,टेकड्या व नद्यांनी वेढलेला आहे.या तालुक्यावर निसर्गाची चांगली उधळण आहे.पर्यटनाला चांगला वाव असूनही येथील राजकीय मंडळी व सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.अशा या मुकणे संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मुकणे यांच्या कारकिर्दीत १९४७ मध्ये हे संस्थान भारतात विलीन झाले.
त्यावेळी तालुक्याची लोकसंख्या फार कमी होती,पण,आता लोकसंख्येचा वेलू गगनावर पोहोचला आहे.त्यामुळे येथील नागरिकांना रोजगार,पाणी व इतर नागरी सुविधा उपलब्ध करताना नगरपरिषदेची चांगलीच दमछाक होत असते.पर्यटनाचा विकास झाला असता तर या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या,पण दुर्देवाने राजकारणी मंडळींची मानसिकता व सरकारची उदासीनता,अशा दोन कारणामुळे हा परिसर कायम उपेक्षित राहीला.अशा सर्व परिस्थितीत पुढील महिन्यात येथे निवडणूक होत आहे.भाजप,राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) दोन्ही शिवसेना,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,मार्क्स.कम्यु.हे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.या निवडणुकीत कोण बाजी मारतो,हे ३ डिसें.रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.जव्हारकर या निवडणुकीत कोणाला पहिली पसंती देतात,याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

