दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम,
कालचे मित्र,आज प्रतिस्पर्धीच्या भूमिकेत,
पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आतापासून सुरु झाला आहे. ज्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे, त्यांनी मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मतदार मात्र या निवडणुकीसंदर्भात फारसा उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.एकेकाळी गळ्यात गळा घालून फिरणारे व एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे जिवलग मित्र,या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
नगरसेवकांच्या अनगोंदी व भ्रष्ट कारभाराने सतत प्रकाशझोतात असलेली पालघर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या पंधरा दिवसांवर आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.भाजप व शिंदे गट ही निवडणुक स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहेत.या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप युती करण्याबाबत निर्णय न घेतल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीमध्ये इच्छुकांनी मात्र आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे ( शिंदे गट ) उत्तम घरत,उबाठा गटाचे उत्तम पिंपळे व भाजपकडून कैलाश म्हात्रे हे तिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.हे तिघेही पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.या निवडणुकीत या तिघांची तोंडे तीन दिशेने आहेत.या नगरपरिषदेवर गेली २६ वर्षे शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व होते,पण पालघरवासीयांना अपेक्षित होती,तशी विकासकामे होऊ शकली नाहीत.त्यामुळे भाजप ही नगरपरिषद आपल्या ताब्यात यावी,यासाठी प्रयत्नशील आहे.या निवडणुकीत भाजप,पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे.भाजपची तयारी पाहून शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.या सर्व धामधुमीत करदाते मात्र गेल्या पाव शतकात आपले शहर बाळसं धरू शकलं नाही,अशी खंत बाळगून आहेत.रस्ते,पाणी,आरोग्य,या तीन महत्वाच्या प्रश्नी गेल्या २५ वर्षात प्रभावी कामकाज होऊ शकले नाही,अशा निर्णयाप्रत ते आले आहेत.निवडून आलेले नगरसेवक आर्थिकदृष्ट्या सुदृढ झाले,पण नगरपरिषद मात्र अद्याप कुपोषितच राहिली आहे.जिल्हा मुख्यालय असलेले हे शहर असून आजही येथील रस्ते व गटारे,” जैसे थे,” स्थितीतच आहेत.दुसरीकडे नागरी संकुले व लोकसंख्येमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे.” नियोजनबद्ध विकास,” हा शब्दच मुळी या नगरपरिषदेचे नगरसेवक व अधिकाऱ्यांना ज्ञात नाही.त्यामुळे सत्तेत कोणीही आले तरी आपल्या नशिबी हालअपेष्टाच असतील, असे मतदारांचे म्हणणे आहे.या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरणारे नेते या निवडणुकीत दंड थोपटून समोरासमोर उभे ठाकले आहेत.या निवडणुकीत पालघरवासीय कोणाच्या पदरात आपल्या मताचे दान टाकते ते निकालाच्या दिवशी कळणार आहे.मात्र आजच्या घडीला सर्वच राजकीय नगराध्यक्षपदावर आमचाच माणूस बसेल,अशी फुशारकी मारू लागले आहेत. पण मतदाराच्या मनात काय आहे ? ३ डिसें.रोजी मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

