दीपक मोहिते,
विरार – मरीन ड्राइव्ह दरम्यान सी – लिंकच्या कामाला हिरवा कंदील,
वसई विरारकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे.सध्या मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असतो,आता तो त्रास कमी होणार असुन त्यांना अवघ्या पाऊण तासात मुंबई गाठता येणार आहे.राज्यसरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढला आहे.उत्तन वसई विरार सी – लिंक या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.या प्रकल्पाला संबंधित विभागाच्या परवानग्या मिळाल्या असुन फक्त पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली नव्हती.मात्र,आता या विभागानेही परवानगी दिल्याने या प्रकल्पाचं काम लवकरच सुरु होणार आहे.या प्रकल्पामुळे पालघर, वसई-विरार आणि डहाणू भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना विरारवरुन थेट मरीन ड्राइव्ह गाठता येणार आहे.
विरार ते दक्षिण मुंबई दरम्यानचा प्रवास सुसाट होणार असुन मरीन ड्राइव्हपर्यंतचा हा प्रवास सिग्नलमुक्त होणार आहे. सध्या विरार ते वर्सोवा या अंतरासाठी दोन तास लागतात.परंतु हा सागरी पूल हे अंतर दीड तासाने कमी करणार आहे. फक्त ४५ मिनिटांत विरार ते मरीन ड्राईव्हपर्यंत आपण पोहोचू शकणार आहेत.त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग आणि उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण कमी होणार आहे.हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पाचा सुरुवातीला ८७ हजार कोटी रु.खर्च होता.मात्र,आता हा खर्च ५२ हजार ६५२ कोटीपर्यंत आणण्यात आला आहे.या प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे.या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरीही याचा खारफुटी आणि वनजमिनीवर परिणाम होणार आहे.या प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन स्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत.
विरार ते मरीन ड्राईव्ह हा सागरी पूल ५५.१२ कि.मी. लांबीचा असणार आहे.मुख्य सागरी पूल हा २४.३५ किमी लांब असणार आहे.हा पुल वर्सोवा भाईंदर दहिसर कोस्टल रोडशी जोडण्यात येणार आहे.

