दीपक मोहिते,
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा विजय,तर राज्यातील विरोधकांना नेस्तानबूत करणारा विजय…
बिहार राज्यात भाजप व जेडीयुने मिळवलेला विजय हा अपेक्षितच होता,पण तो इतका जबरदस्त असेल,असे कोणालाही वाटले नव्हते.ज्या पद्धतीने जनसुराज,काँग्रेस व राजदने भाजप व जेडीयु समोर आव्हान उभे केले होते,ते पाहता नितीशकुमार व अमित शहा या दोघांची चांगलीच दमछाक होईल,असे वाटले होते.पण फासे उलटे पडले व ही लढत एकतर्फी झाली.या निवडणुकीतील निकालानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.या निकालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून भाजप व जेडीयु यांना मिळालेल्या या विजयात आयोगाचे मोठे योगदान असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे.

या निवडणुकीत भाजपने १०१ जागा लढवल्या व ९८ जागांवर विजय मिळवला तर जेडीयुनेही तेवढ्याच जागा लढवून ८८ जिंकल्या.त्यांचा घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाने १८ जागांवर आपले नाव कोरले.गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान याने नितीशकुमार यांच्या उमेदवारासमोर आपले उमेदवार उभे केले होते.त्यामुळे जेडीयुला अनेक जागांवर फटका बसला होता.चिराग पासवान यांचे दलित समाजात बऱ्यापैकी वर्चस्व आहे,त्यामुळे अमित शहा यांनी त्यांना या निवडणुकीत दुखावले नाही.नितीशकुमार कोंडीत पकडण्यासाठी अमित शाह यांनी लोकजनशक्ती पक्षाला हाताशी धरले व त्यांना बऱ्यापैकी रसद पुरवली.लोकजनशक्ती पक्षानेही डोळ्यात भरेल,इतके यश मिळवले.दुसरीकडे महागठबंधन मधील राजदने १४३ जागा लढवल्या व केवळ २० जागा जिंकल्या,तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाला.त्यांनी ६१ जागा लढवल्या पण त्यांना केवळ ३ जागावर समाधान मानावे लागले.या निवडणुकीत भाजप – जेडीयु युतीने ५२ % मते मिळवली.गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ३७ % मते मिळवली होती,या निवडणुकीत त्यांच्या ११ % मतांनी वाढ झाली.तर जेडीयुच्या मतांमध्ये ७ % ने वाढ झाली.ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडली बहना योजनेअंतर्गत दीड कोटी महिलांना दहा हजार रु.दिल्यामुळे ७८ % महिलांनी भाजप – जेडीयुला भरभरून मते दिली.निवडणुकीपूर्वी महिलांना योजनेअंतर्गत दहा हजाराचा पहिला हप्ता देण्यात आला,त्यानंतर प्रचारादरम्यान दोन हप्ते देण्यात आले.त्यामुळे निवडणुकीचे पारडे फिरले.यासंदर्भात विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या,पण आयोगाने त्या धुडकावून लावल्या.या दहा हजाराने तेजस्वी यादवचा घात केला.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही तेजस्वी यादवची घोडदौड रोखण्याकामी भाजप – जेडीयूला हातभार लावला. या निवडणूकीत काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यात अक्षम्य दिरंगाई केली.त्यामुळे राज्यात मोठ्या संख्येने असलेला यादव समाज नाराज झाला व त्याचा जबर फटका काँग्रेसला बसला.शेवटच्या क्षणी काँग्रेसने त्यांचे नांव जाहीर केले,पण तोवर वेळ निघून गेली होती.या निवडणुकीच्या प्रचारात जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी भाजपचे नेते व उमेदवार यांच्यावर आरोपाची राळ उठवून दिली.परंतु भाजप व जेडीयू,या दोघांनी त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे टाळले.हा भाजपच्या निवडणूक स्ट्रॅटेजीचा भाग होता.प्रशांत किशोर यांच्या आततायीपणामुळे त्यांची पाटी कोरी राहिली.आता या निवडणुकीतील निकालाचे पडसाद महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटण्याची दाट शक्यता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी भाजप, महाविकास आघाडी नेस्तनाबूत करण्याच्या तयारीत आहे.त्यासाठी भाजप ” मिशन लोटस,” राबवण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करत आहे.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाचे काही खरे नाही.

