दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
या खड्ड्याचे करायचे तरी काय ? वसईकरांचा आक्रोश….
वसई तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा व भोगाव्या लागत असलेल्या मरण यातना तसेच मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या या खड्ड्याचे करायचे तरी काय ? अशा विवंचनेत वसईकर नागरिक सापडले आहेत.आमची या त्रासातून सुटका करण्याऐवजी राजकीय नेते आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एकमेकांच्या उरावर बसत आहेत.त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारीही चांगलेच निर्ढावले आहेत.या अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून मिळणाऱ्या टक्केवारीमध्ये केवळ रस आहे.त्यांना या ज्वलंत विषयाचे सोयरसुतक नाही.अशा सर्व परिस्थितीमध्ये करदाते मात्र हालअपेष्टा सहन करत आहेत.आमचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे,आम्हाला प्यायला शुद्ध पाणी मिळावे,दर्जेदार आरोग्य,वैद्यकीय व शिक्षणाच्या सुविधा मिळाव्या,यासाठी करदात्यांनी यंदा परिवर्तन घडवून आणले,पण आज त्यांच्यावर कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली आहे.आजही ” जैसे थे,” स्थितीच पाहायला मिळत आहे.
कामण,पोमण,चिंचोटी या पंचक्रोशीतील नागरिकांना आता स्वप्नातही खड्डे दिसू लागले आहेत,पण राजकीय नेते व अधिकाऱ्यांच्या हृदयाला पाझर फुटत नाही.आजवर रस्ते अपघातात अनेक तरुण जीवानिशी गेले,पण या मंडळींना त्याच्याशी देणेघेणे नाही.
अशी ही परिस्थिती किती काळ अशीच राहणार आहे,हे आजच्या घडीला कोणीच सांगू शकत नाही.वसईकर नागरिकांच्या नशिबी केवळ ” यातना भोगणे,” हेच असेल तर त्यांनी काय करावे ? या प्रश्नाचे उत्तर देवाभाऊच्या सरकारने द्यायला हवे.पण ते मिळणार नाही.दररोज सरकारकडून अमुक तमुक निधी मंजूर झाला,व तसेच विकासकामांची पाहणी करताना रिल्स पाहायला मिळतात,पण प्रत्यक्षात कामे सुरू होत नाहीत,हे काय गौडबंगाल आहे,याचा उलगडा मात्र होत नाही.असे वर्षानुवर्षे सुरू आहे,आणि आजही तेच सुरू आहे.परिवर्तन करून आम्ही काय मिळवले ? असा प्रश्न आता वसईकर स्वतःलाच विचारू लागले आहेत.

