दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
बिच्चारे खड्डे,विनाकारण बदनाम होत आहेत,
रस्त्यावरील खड्ड्यावरून वसईतील राजकारण बरेच तापू लागले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रश्नी चांगलेच धारेवर धरले आहे.विरोधक व सत्ताधारी यांच्यात सुरू असलेल्या या संघर्षात नागरिक व रस्त्यावरील खड्ड्यांचे मात्र नाहक मरण होत आहे.खड्ड्यांचे म्हणणे आहे की ज्यांनी डांबर खाल्ले आणि जे सत्ताधारी पक्षाचे लोक केवळ मजा बघताहेत,ते नामानिराळे राहत असून आम्ही खड्डे व नागरिक मात्र मरणयातना भोगत आहोत.आमचे दुःख कोणी ऐकायला तयार नाही.
दरवर्षी पावसाळा संपला की आमच्यावर उपचार ( दुरुस्ती व डागडुजी ) करण्यात येत असायचे,पण यंदा हे उपचार का होत नाहीत,याविषयी काहीच उलगडा होत नाही.अशीच परिस्थिती राहिली तर रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट होईल,” रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते,” हे नागरिकांना शोधायला लागणार आहे.महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना याप्रकरणी खासदार व आमदारांचा धाक नाही,असे म्हंटल्यास ते वावगं ठरू नये.
आजवर वसईची अशी परिस्थिती कधीही झाली नव्हती.ती यंदा का झाली ? याचा शोध घेण्याची गरज आहे.आज वसईतील रस्ते,त्यावरील खड्डे व त्रस्त नागरिक,या सर्व प्रकरणी आम्हाला का बदनाम करता ? असा सवाल विचारू लागले आहेत.ही सारी पापे तुमची असताना आमच्या नशिबी हे भोग का म्हणून ? असे त्यांचे म्हणणे आहे.

