दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आचोळे हॉस्पिटल ” तू,तू,मै,मै,” ; निदान लोकांसाठी तरी एकमेकांच्या उरावर बसू नका…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर वसई तालुक्यातील राजकारण हळूहळू तापू लागले आहे.नव्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय उपटण्यासाठी राजकीय पक्ष आता एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत.पण मतदारांच्या लेखी,या अशा स्पर्धेला काडीचीही किंमत नाही.राजकीय पक्षाच्या अशा या ” पळा,पळा कोण पुढे पळे तो,” शर्यतीमध्ये वसईकराना बिलकुल स्वारस्य नाही.त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या,अडचणी कशा मार्गी लागतील व प्रभावी नागरी सुविधा कशा उपलब्ध होतील,याची चिंता आहे.
गेली अनेक वर्षे खितपत पडलेला हॉस्पिटलचा प्रश्न वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून एकदाचा मार्गी लावला.मुख्यमंत्र्यांनी नालासोपारा पूर्वेस मौजे आचोळे,या गावातील जमीन या कामासाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर सरकार दरबारी वेगाने हालचाली होऊन संबधित जमिनीच्या सातबाऱ्यावर महानगरपालिकेचे नांव लावण्यात आले.येथूनच श्रेय उपटण्याच्या राजकारणाला वेग आला.दोन दिवसापूर्वी झालेला प्रकार हा या पुढे घडणाऱ्या महाभारताचा पहिला अंक होता.लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यासाठी आले असता,तेथे जे काही घडले,ते सुशिक्षित तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक नगरीला शोभादायक नव्हते.राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात,याचे यथार्थ दर्शन यानिमित्ताने करदात्यांना झाले.वास्तविक अशाप्रकारची पाहणी करायला जाताना मनपाच्या अधिकाऱ्यांनी देखील योग्य ती काळजी घ्यायला हवी होती, या पाहणीदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षण घेण्याची आवश्यकता होती.पण अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही.अशी पाहणी अचानकपणे करणे,हे देखील मुळात चुकीचे होते.घटनास्थळी जे काही महाभारत घडले,त्यामुळे वसईकर नागरिकांमध्ये चुकीचे संकेत गेले.राजकारण्यांना वर्षानुवर्षे रखडलेला हा ज्वलंत प्रश्न मार्गी लागू नये,असे वाटते,अशी चर्चाच आता सर्वत्र सुरू झाली आहे.वास्तविक संबधित राजकीय नेत्यानेही घटनास्थळी जाऊन आक्रस्ताळेपणा करणे,चुकीचे होते.त्यांनी अचानकपणे पाहणी करण्यास आलेल्या लोकांसोबत वाद घालण्याऐवजी आपली बाजू आयुक्तासमोर मांडायला हवी होती.पण,त्यांनी तसे न करता,हमरीतुमरी करण्यात धन्यता मानली.आज सोशल मीडियावर जे काही दाखवलं जात आहे,त्यावरून एकच निष्कर्षं निघतो,तो म्हणजे या राजकीय पक्षांना लोकांच्या प्रश्नाशी कोणतेही देणेघेणे नाही.एवढे महाभारत घडून गेल्यानंतर आयुक्त व त्यांचे वरिष्ठ अधिकारी याविषयी मूग गिळून बसले आहेत.त्यांचे हे वागणे म्हणजे ” तुम लढो,हम कपडा संभलता है,” या पठडीतील आहे.त्यामुळे सध्या राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे.त्या दिवशी ” नेमके काय घडले ?,” हे त्यांनी करदात्यांना स्पष्ट करायला हवे होते.या घटनेनंतर तरी आयुक्तांनी संबधित विभागाकडून जमिनीची मोजणी,टी.एल.आर.व संबधित कामे युद्धपातळीवर करून घ्यायला हवीत.या जमिनीवर असलेली अतिक्रमणे कोणाची आहेत हे त्यांनी स्पष्ट करायला हवे,तसेच ती हटवून हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा केला पाहिजे.मात्र काल घडलेल्या घटनेमुळे हॉस्पिटलच्या उभारणीचे काम रखडता कामा नये.कारण वसईकर नागरिक वर्षानुवर्षे हॉस्पिटलच्या प्रतिक्षेत आहेत.निदान या ज्वलंत प्रश्नी तरी राजकारण्यांनी श्रेय उपटण्यासाठी एकमेकांच्या उरावर बसू नये,एवढीच करदात्यांची प्रामाणिक इच्छा आहे.

