दीपक मोहिते,
हे कसले गतिमान सरकार ? हे तर गुन्हेगारांना अभय देणारे सरकार…
गेल्या पाच वर्षात आपले राज्य पूर्णपणे रसातळाला गेले असून या परिस्थितीला तीन इंजिनच्या सरकारचा भ्रष्ट व अकार्यक्षम कारभार कारणीभूत आहे.राज्यात सुरू असलेले हत्यासत्र,मोक्याच्या जमिनी बळकावणे,आर्थिक घोटाळे व गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढणे,इ.घटनांमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन सध्या असुरक्षित बनले आहे.गेल्या ७७ वर्षात पूर्वीचे एकही सरकार पोलिसांच्या कामात कधीही हस्तक्षेप करत नसत,पण हल्ली देवेंद्र फडणवीस यांचे सरकार त्यास अपवाद ठरले आहे.आजच्या घडीला पोलीस यंत्रणा गृहमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय एकही निर्णय घेऊ शकत नाही.या अशा परिस्थितीमुळे राज्याची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पार खालावली आहे.

गेल्या पाच वर्षात संतोष देशमुख,सोमनाथ सूर्यवंशी,महादेव मुंडे,वैष्णवी हगवणे व आता डॉ.संपदा मुंडे यांच्या झालेल्या निर्घृण हत्या या सडलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचे यथार्थ दर्शन घडवतात.सत्ता ही लोकांच्या हितासाठी राबवणे,हे अभिप्रेत असताना देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे बेधुंदपणे वागत आहे.मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर गंभीर गुन्हे आहेत.पण,त्यांच्यावर कारवाई होत नाही.एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा जगात दुसरा क्रमांक होता,आज काय परिस्थिती बघायला मिळते.पूर्वी पोलिसांना पाहिले की आपल्या बायका,मुलींमध्ये आपण सुरक्षित आहोत,अशी भावना निर्माण होत असे,आज पोलीस दिसले की लोक भितीच्या सावटाखाली येतात.या बदलाचे सारे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते.मुख्यमंत्री आपला पाठीराखा आहे,हे पोलिसांना कळल्यानंतर पोलीस बेफाम होणार नाही तर काय होणार ? बीडच्या वाल्मिकी कराड प्रकरणात सरकार व पोलीस यंत्रणेची जी थू थू झाली,तेवढी कधीही झाली नव्हती.कराड पोलिसांना अनेक दिवसात सापडत नव्हता,अखेर एके दिवशी तो आपल्या आलिशान कारमधून संबधित पोलीस ठाण्यात हजर झाला आणि मग पोलिसांनी त्याला अटक केली.या सर्व घडामोडीमुळे पोलिसांची शान धुळीला मिळाली आहे.आपले गृहखाते किती अकार्यक्षम आहे,हे यावरून स्पष्ट झाले.डॉ.संपदा मुंडे हीच्या हत्येतील गुन्हेगार हे पांढरपेशा वर्गातील आहेत,त्यामुळे तिच्या पालकांना न्याय मिळण्याची शक्यता फार कमी आहे.संतोष देशमुख,सोमनाथ सूर्यवंशी,महादेव मुंडे व वैष्णवी हगवणे,यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांना जो मनस्ताप सहन करावा लागला,तोच मनस्ताप डॉ.संपदा मुंडे हीच्या आईवडिलांच्या नशिबी आला आहे.एकेकाळी जे राज्य सुखा समाधनाने जगत होते,आज त्याची रया पार बिघडली आहे.अशाप्रकारचे गतिमान सरकार,आपल्या नशिबी येईल,असे राज्यातील रयतेला कधीही अपेक्षित नव्हते.

