दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
बिघडते पर्यावरण संतुलन ; आपल्यासमोर एक आव्हान…
जगभरात ओझोन व पर्जन्यमानाचे प्रमाण सतत कमी होत चालले आहे.त्यामुळे पृथ्वीवरील सजीवाना आता सभोवतालच्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागत आहे.ज्या सजीवाना आपल्यामध्ये बदल घडवण्यात यश मिळते,ते तग धरून राहता
त व ज्याना ते शक्य होत नाही,अशाना आपले प्राण गमवावे लागतात.अशी स्थिती का निर्माण झाली ? यावर गेल्या १०० वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोट्यवधी कार्यशाळा,चर्चासत्रे,उपक्रम पार पडले.परंतु पर्यावरणाचा होत असलेला विनाश मात्र रोखणे,एकाही देशाला शक्य झाले नाही.आपल्या पालघर जिल्ह्यात पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस रसातळाला जाऊ लागले आहे.यंदा मे महिन्यात सुरु झालेला पाऊस नोव्हें.उजाडला तरी थांबण्याचे नांव घेत नाही.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात होत असलेली प्रचंड वृक्षतोड,मातीउपसा व समुद्र किनाऱ्याची धूप,आदी कारणे या साऱ्या संकटामागे आहेत.

आज पर्यावरणाच्या अधोगतीमुळे संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकले आहे.त्सुनामी,दर सहा महिन्यानी आदळणारी ओखीसारखी विविध वादळे व पाचवीला पूजलेला दुष्काळ.हे सारे केवळ विकासाच्या नावाखाली मानवजातीने घातलेल्या धूमाकुळाचा परिणाम आहे.जलप्रदूषण व हवेतील प्रदुषणास केवळ आपणच जबाबदार आहोत.वायुमंडळात प्राणवायुचा विपुल साठा असतो,हेच वायुमंडळ पृथ्वीभोवती आवरणाच्या रुपात असते,ते उष्ण व हानिकारक किरणांपासून भूतलावरील सजीवांचे रक्षण करीत असते.परंतु मानवाच्या चुकांमुळे हे वायुमंडळ आता विस्कळीत होवू लागले आहे.

प्रचंड वृक्षतोड़,नदीचे पात्र बदलणे,विषारी द्रव्ये समुद्र व नदीपात्रात सोडणे,अशा कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस अस्ताव्यस्त होत आहेच,परंतु गावच्या गावे अवर्षणग्रस्त होत आहेत.भूजल पातळी सतत खाली जात आहे,यामागे वनक्षेत्रातील वृक्षसंपदेची हानी हेच एकमेव कारण आहे.झाडांच्या मुळांमध्ये जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची प्रचंड क्षमता असते.त्या क्षमतेवरच मानवाने घाला घातल्याने जमिनीखाली असलेले पाण्याचे स्त्रोत व साठे कमी होत गेले.
हे सारे केवळ ” विकास, ” या एकमेव गोंडस नावाखाली सुरु आहे.विकास हा हवाच परंतु स्वत:चाच विनाश करून नकोय.हे जोवर मानवाला उमगणार नाही,तोवर निसर्गाचा प्रकोप असाच सुरु राहील.राज्यात सुमारे वीस हजार गावात ओला दुष्काळ निर्माण झाल्याचे जाहीर झाले आहे.दुष्काळाची दाहकता स्पष्ट करताना सरकार काही तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना करत आहे.त्यामध्ये गुराना चारा व अन्य ८ ते १० सवलती जाहीर केल्या आहेत.या सवलती देणे म्हणजे उपाययोजना करणे असे होत नाही,अशी स्थिती वारंवार येता कामा नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे व नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्याची प्रभावीपणे अमलबजावणी करणे आवश्यक ठरते.याउलट सरकार विविध प्रकल्पासाठी सरसकट वृक्षतोड़ करण्यास परवानग्या देत सुटले आहे.हे सर्वप्रथम थांबण्याची आवश्यकता आहे,तरच निसर्गाचा कोप आपल्याला थांबवता येऊ शकेल.

