दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सरकारच पक्षांतर कायद्याची मोडतोड करण्यात अग्रेसर,
लोकशाही व्यवस्थेमध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये कोण जिंकणार व कोण हरणार याच्याशी सर्वसामान्य जनतेला कोणतेही देणेघेणे नाही.आपला हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून देताना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्नांची सोडवणूक कोण करतो,आपले गाऱ्हाणं कोण ऐकून घेतो,याचा ते विचार करत असतात.त्याला घोडेबाजार,एकमेकांची माणसे फोडणे,या अशा विषयात बिलकुल स्वारस्य नसते.चालायला धड रस्ते,पिण्याचे शुद्ध पाणी,रोगराईमुक्त परिसर, दर्जेदार शिक्षण,प्रभावी वैद्यकीय सेवा व अडचणी/ समस्यांचे निराकरण,जे लोकप्रतिनिधी करतील,त्यांच्याच पक्षाला लोक डोक्यावर घेतात,असा आजवरचा अनुभव आहे.सत्तेसाठी होणारी हाराकीरी,एकमेकांच्या उरावर बसणे,आमिष दाखवून एकमेकांची माणसे फोडणे,इ.बाबी या मतदारांच्या लेखी दुय्यम आहेत.जो लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या विचारसरणीला मूठमाती देत अन्य विचारसरणीच्या पक्षात जातो,तो सर्वसामान्य मतदारांना कधीच अपेक्षित नसतो.त्याच्या या पक्षांतराच्या मागे केवळ वैयक्तिक स्वार्थ असतो.

पण दुर्देवाने अलीकडच्या काळात या अशा हवश्या नवश्याना सुगीचे दिवस आले आहेत.पक्षाची विचारसरणी,आता हळूहळू लोप पाऊ लागली आहे.ही एकप्रकारे लोकशाहीची विटंबनाच आहे.पूर्वी काळी असलेल्या चांगल्या वृत्तीचा आता अपप्रवृत्तीमध्ये बदल होत चालला आहे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८५ साली ५२ वी घटनादुरुस्ती करून लोकशाही व्यवस्थेला घातक असलेल्या पक्षांतराला आळा बसावा,असा उदात्त हेतू उराशी बाळगत देशभरात पक्षांतर कायदा अस्तित्वात आणला.पण मुर्दाड राजकारण्यांनी त्या कायद्याचा अक्षरशः फडशा पाडला.या कायद्यातील पळवाटा दूर करून हा कायदा प्रभावी करण्याचे काम केंद्र सरकारने करायला हवे होते,पण आपले सरकार मात्र हा कायदा कायमस्वरूपी मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.सरकार,या माध्यमातून लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या संस्था उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे.लोकसभा निवडणुकीत ” अबकी बार चारसो पार,” ही घोषणा प्रत्यक्षात उतरली असती तर संविधानाला ओरखडे काढण्यात मोदी सरकार यशस्वी झाले असते,पण देशवासीयांनी गेल्या वर्षी झालेल्या त्या लोकसभा निवडणुकीत त्यांना अडीचशेच्या आत रोखले व त्यांचे स्वप्न धुळीला मिळाले.देशाचे संविधान बदलण्याचे प्रयत्न गेल्या दहा वर्षांपासून सुरू झाले आहेत,पण सरकारला गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत देशवासीयांनी ते पार धुडकावून लावले.तरीही मोदी सरकार हे स्वस्थ बसणार नाही.कारण,मोदी यांचे सरकार हे भांडवलदाराना झुकते माप देणारे आहे.आज केंद्र सरकार हे अदानी, अंबानी,बिर्ला व अन्य काही भांडवलदार चालवत आहेत. तर दुसरीकडे या भांडवलदाराकडून नैसर्गिक संसाधनाची लूट होऊ नये,यासाठी जीवाची बाजी लावून लढणारे सोनम वांगचूक सारखे सामाजिक कार्यकर्ते जोधपूरच्या कारागृहात खितपत पडले आहेत.ही आपल्या लोकशाहीची क्रूर चेष्टाच आहे.

