दीपक मोहिते,
जागतिक पर्यटन दिन ; देशात पर्यटनाला चांगला वाव आहे,
आज जगभरात जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होत आहे.पाच वर्षांपूर्वी कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राची अक्षरशः वाताहत झाली होती.परकीय चलन मिळवून देणारा हा व्यवसाय,अद्याप सावरलेला नाही.या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येण्यासाठी किमान ५ वर्षे लागणार आहेत.कोरोनाचा प्रभाव नाहीसा झाल्यामुळे पर्यटन विकासाला हळूहळू गती मिळू लागली व आज हा व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरावला आहे.त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
देशाच्या आर्थिक विकासामध्ये पर्यटनाचे फार मोठे योगदान आहे.आपले राज्य,पर्यटन क्षेत्रात अव्वल क्रमांकावर असून बऱ्यापैकी परकीय चलन मिळवून देणारे आहे.महाराष्ट्र हे राज्य पर्यटन स्थळांनी समृद्ध,असे राज्य आहे.इतर राज्यातही बऱ्यापैकी पर्यटनस्थळे आहेत.उदा.राजस्थान,
तेलंगणा,केरळ,काश्मीर,
हिमाचल प्रदेश,गुजरात,प.बंगाल व ओरिसा.१९७० मध्ये याच दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेची ( यु.एन.डब्ल्यू.टी.ओ. ) स्थापना झाली.२७ सप्टें.१९८० पासून ” जागतिक पर्यटन दिन,” साजरा करण्यास सुरुवात झाली.पर्यटनवाढीला चालना मिळावी,यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स जाहीर करण्यात येत असतात.गेल्यावर्षी ” पर्यटन व शांतता,” अशी थीम होती.यंदा ” पर्यटन व शाश्वत परिवर्तन,” अशी आहे.मोदी सरकारने पर्यटन क्षेत्रवाढीसाठी विविध योजना आखल्या आहेत.महाविद्यालयीन शिक्षणात ” पर्यटन व्यवस्थापन व नियोजन,” या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.अनेक पर्यटन कंपन्या,आपल्या देशात प्रचंड गुंतवणूक करत आहेत.त्यामुळे मोठ्याप्रमाणात तरुण-तरुणीना रोजगार उपलब्ध होत आहे.आज अनेक तरुण ” ट्रॅव्हल व टुरिझम,” विषय घेऊन पदवीधर होत आहेत.पर्यटन हे क्षेत्र,निवास,वाहतूक,अन्न, इव्हेंट्स व साहसी पर्यटन इ.सेवा देणारे क्षेत्र आहे.या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.गाईड,टूर्स ऑपरेटर,स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी,हॉटेल्स,रिसॉर्टस,
असे स्वतःचे उद्योग आपण सुरू करू शकतो.
पाच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटातून आपण आता बाहेर पडलो आहोत.त्या काळात पर्यटन,पूर्णतः ठप्प झाले होते.ते आता रुळावर आले आहे.त्यामुळे केंद्र व राज्यसरकारांनी या क्षेत्राला चालना मिळावी,नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात,यासाठी संयुक्तरीत्या प्रयत्न करणे,आवश्यक ठरते.नवनवीन प्रदेश पाहणे,भटकंती करणे,लोकजीवन व निरनिराळ्या संस्कृतीचा अभ्यास करणे,दऱ्याखोरे व समुद्रकिनारी निसर्गाचा आनंद लुटणे व विविध परिसरातील भोजनाचा आस्वाद घेणे,इ.बाबी पर्यटकांची विशेष आकर्षणे असतात.त्यासाठी सरकारी पातळीवरू बजाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत.
भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पनात ( जी.डी.पी. ) पर्यटन व्यवसायाचा हिस्सा ९.०८ टक्के इतका आहे.आपल्या देशात सुमारे ४ कोटी जणांना या व्यवसायात रोजगार मिळतो.२०२४ या आर्थिक वर्षात या पर्यटन व्यवसायातून देशाला सुमारे ३० अब्ज डॉलर्सची कमाई झाली होती.यंदा यामध्ये दुपट्टीने वाढ होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पण कोरोनाच्या काळात जगभरातील देशांनी आपल्या सीमा बंद केल्या होत्या,त्यामुळे व्यवसायाला जबर किंमत चुकवावी लागली.आपल्या देशाला त्याकाळात सुमारे ५.८५ लाख कोटीचा फटका बसला होता.हे नुकसान भरून काढण्यासाठी बराच काळ गेला.आजच्या घडीला अनेक देशाची अर्थव्यवस्था पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहे.त्यास उभारी देण्यासाठी देशातील स्थळांचा विकास करणे,ही काळाची गरज आहे.
पर्यटन,हा व्यवसाय केवळ आर्थिक कमाई करण्यासाठी नसतो,तर या माध्यमातून सामाजिक,सांस्कृतिक,
राजकीय व आर्थिक विकासात महत्वाची भूमिका पार पाडत असतो.दोन देशातील परस्पर संबंध अधिक मजबूत होत असतात.आपल्या देशातील पुरातत्व वारसा,ऐतिहासिक वास्तू व धार्मिक स्थळे,हे सारे परदेशी नागरिकांचे विशेष आकर्षणे आहेत.अशा जुन्या व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे.परंतु दुर्देवाने आपल्याकडे ते होत नाही.पुरातत्व विभाग असून नसल्यासारखे आहे.आज महाराष्ट्रातील गडकिल्ले नामशेष होत चालले आहेत.उदा.द्यायचे झाल्यास वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याचे देता येईल.आज हा किल्ला अश्रू ढाळत दिवसेंदिवस कोसळतोय,पर्यटक ओसरले असले तरी तो प्रेमीयुगुलांसाठी तो पर्वणी ठरला आहे.या किल्ल्याची ओळखच आता ” सुमसाम किल्ला,” अशी झाली आहे.येथील एकांतवास,प्रेमीयुगुलासाठी तो आकर्षण ठरला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री गडकिल्ले,ऐतिहासिक राजवाडे,निसर्गरम्य समुद्रकिनारे यांचे सतत गोडवे गात असतात.पण त्यांच्या संवर्धनकामी मात्र ही मंडळी उदासीनता दाखवतात.त्यामुळे पर्यटन विकासाला अपेक्षित चालना मिळू शकली नाही.२७ सप्टें. हा एक दिवस ” जागतिक पर्यटन दिन,” साजरा करून पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येणार नाहीत,तर वर्षाचे बारा महिने अहोरात्र झोकून देऊन काम करण्याची गरज आहे.

