दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१९,
प्रभाग क्र.१९ ; परप्रांतीयांना आंदण,
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेला हा प्रभाग गेली अनेक वर्षे विकासाच्या बाबतीत कायम मागासलेलाच आहे.त्यामुळे अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांचे व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.या प्रभागाची ओळख ” बकाल,” अशी करण्यामध्ये या दोघांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली.अनेक परप्रांतीय गुंडांनी या परिसराचे अक्षरशः लचके तोडले तर मनपा अधिकाऱ्यांनी आपल्या सात पिढ्या बसून खातील,इतका रग्गड पैसा कमावला.वसईच्या विकासाचा कसा सत्यानाश केला जातो,हे या प्रभागावरून स्पष्ट होऊ शकते.
वन,आदिवासी व सरकारी जमिनी,गुंड व नोकरशाही हातात हात घालून कसे लुटतात,हे या प्रभागात उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे पाहता आपल्या लक्षात येते.तोडण्यात आलेली अनधिकृत बांधकामे पुन्हा रातोरात कशी उभारली जातात ? ते या प्रभागातील बांधकामे पाहिल्यास आपल्या लक्षात येते.अनधिकृत बांधकामे करणाऱ्या गुंडासाठी हा प्रभाग रोलमॉडेल ठरला आहे.महामार्गालगत झालेली अनधिकृत बांधकामे आता थेट येथील डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोहोचली आहेत.कालांतराने ती डोंगरमाथ्यावर पोहोचली,तर तुम्हा – आम्हाला आश्चर्य वाटता कामा नये.आज या भागात राहणारा आदिवासी समाज देशोधडीला लागला आहे.मूळ मालक असलेल्या समाजाची घोर फसवणूक करत गुंडांनी त्यांच्या जमिनी लुटल्या.या गोरखधंद्यात पोलीस व लोकप्रतिनिधी या दोघांनी पण वाहत्या गंगेत चांगलेच हात धुवून घेतले.आज ना उद्या येथे असलेला डोंगर देखील बोडका होणार आहे.एकीकडे पालकमंत्री १ कोटी बांबूची झाडे लावण्याचा संकल्प सोडतात तर दुसरीकडे महानगरपालिका मुख्यालयापासून दहा कि.मी.अंतरावर असलेला डोंगर आता शेवटचे आचके देऊ लागला आहे.
असो,अनधिकृत बांधकामे व चाळी असलेल्या या प्रभागामध्ये लोकसंख्या सतत वाढत आहे.वीज व पाणी,या दोन महत्वाच्या सुविधा सहजगत्या उपलब्ध आहेत.या प्रभागाला लागून पेल्हार धरण असल्यामुळे जलवाहिन्या फोडून पाणीचोरी मोठ्याप्रमाणात होत असते.उन्हाळ्यात वसईकर जनता पाणीटंचाईमध्ये होरपळत असताना या प्रभागातील रहिवाशांची तहान चोरीच्या पाण्यावर भागली जाते.या प्रभागात ” आकडे टाकून विजेची चोरी,” हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे.त्यामुळे रहिवाश्यांना ना विजेची चिंता भेडसावते ना विजेच्या बिलाची..!
या प्रभागात वाकणपाडा,वानोरापाडा,
पेल्हार,जाबरपाडा,
वसई फाटा,मानिचपाडा,राष्ट्रीय महामार्ग,धुमाळनगर,
अवधूत आश्रम,नागरेपाडा व तुंगारेश्वर,इ.परिसराचा समावेश आहे.या प्रभागाची लोकसंख्या ४२ हजार ६५८ च्या घरात पोहोचली असून त्यापैकी अनु.जाती – २ हजार ३२६ तर अनु.जमाती – ५ हजार ३१९ इतकी आहे.एकूण २९ प्रभागांपैकी हा एकमेव प्रभाग असा आहे,ज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या सर्वाधिक आहे.२० वर्षांपूर्वी ही लोकसंख्या २० हजाराच्या घरात होती.आता ती पाच हजारावर आली आहे.बाहेरून येथे स्थायिक होणाऱ्या नागरिकांच्या लोकसंख्येचा वेग असाच राहिला तर या प्रभागात आदिवासी औषधालाही उरणार नाही.या प्रभागावर बहुजन विकास आघाडीचे गेले तीन दशक वर्चस्व होते.पण या काळात परिसर विकासाकडे त्यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले.त्याचे परिणाम लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना भोगावे लागले.गेल्या अडीच वर्षात भाजपने या प्रभागात आपले पाय घट्ट रोवले असून महानगरपालिका निवडणुकीतही गेल्या निवडणुकीत ते बाजी मारतील,अशी शक्यता आहे.

