दीपक मोहिते,
नको ती महानगरपालिका,नको ती निवडणूक,
आमच्या नशिबी हे दुष्टचक्र कशासाठी – करदात्यांचा आक्रोश,
गेले अठरा दिवस आपले news27.in media वसई तालुका व पालघर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती,महानगरपालिकाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचाली,प्रभागनिहाय विकासकामे,तसेच लोकप्रतिनिधींची निष्क्रियता व अधिकारी वर्गाचा खादाडपणा याविषयी सविस्तर विवेचन करत आहे.मनपाच्या एकूण २९ प्रभागांपैकी १८ प्रभाग तर जिल्हा परिषदेच्या ५७ गटापैकी ४६ गट आपण प्रसिद्ध केले असुन उर्वरीत प्रभाग व गट येत्या दहा दिवसांत पूर्ण करणार आहोत.

तत्पूर्वी आपण गेल्या चार ते पाच दिवस प्रभाग व गटात फेरफटका मारून या दोन्ही निवडणूकासंदर्भात मतदारांच्या राजकीय पक्षाकडून काय अपेक्षा आहेत ? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.जवळपास २५ मतदारांनी आमच्याकडे प्रतिक्रिया नोंदवल्या.त्यापैकी तीन ते चार जणांच्या प्रतिक्रिया आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात प्रसिद्ध करत आहोत.या प्रतिक्रियामधून सर्वांचा एकच सूर ऐकायला मिळाला तो म्हणजे आम्हा नागरिकांचे दैनंदिन सुखकर व्हावे,शहराचा नियोजन बद्ध विकास व्हावा,सगळ्यात महत्वाचे म्हणणे तिजोरीवर दरोडा टाकण्याचे सत्र जे सुरू आहे,ते बंद व्हावे व आम्ही जो कर देतो,त्या बदल्यात आम्हाला नागरी सोयी व सुविधा मिळायला हव्यात अशाप्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.चला,आता एक नजर टाकूया त्यांच्या प्रतिक्रियावर…
१ ) राजाराम परब – सेवानिवृत्त अधिकारी,वसई,
वसई- विरार महानगरपालिका स्थापन होऊन पंधरा वर्षे झाली.तीचे आगमन हे तालुक्यातील शहरी भागाचा कायापालट करण्यासाठी असेल,असा आमचा विश्वास होता,पण पहिल्या दोन वर्षातच या महानगरपालिकेचे पितळ उघडे पडले.लोकांची कामे होण्याऐवजी केवळ ” ओरबाडून खाणे,” असा एकमेव कार्यक्रम राबवण्यात नगरसेवक व अधिकाऱ्यांनी धन्यता मानली.अधिकारी,ठेकेदार व नगरसेवक यांची झालेली अभद्र युती आमच्यासारख्या करदात्याच्या मुळावर आली.महानगर पालिकेकडून आमच्या ज्या काही आशा व अपेक्षा होत्या,त्या अवघ्या दोन वर्षात पार धुळीला मिळाल्या.मंत्रालयाच्या विविध विभागात सरप्लस असलेल्या अधिकाऱ्यांना या महानगरपालिकेत पाठवून लूट करण्याचे सत्र सुरू झाले.या अधिकाऱ्यांनी स्वतःचे खिसे तर भरलेच व मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही मालामाल केले.येथून महानगरपालिका आर्थिकदृष्टया कुपोषित होत गेली.महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात दरसाल हजारो कोटीचा भ्रष्टाचार होत असतो.महानगरपालिकेचे दोन वरिष्ठ अधिकारी आज तुरुंगाची हवा खात आहेत.त्यांच्या घरी सापडलेले घबाडाचे भव्यदिव्य स्वरूप पाहता आमचे डोळे पांढरे झाले.कोरोना काळात तर अधिकाऱ्यांनी खरवडून खाल्ले.आमची महानगरपालिका ही चराऊ कुरण आहे,असे समजून सर्वांनीच पोट फुटेपर्यंत खा खा खाल्ले व आजही खातच आहेत.आजच्या घडीला आमच्यासमोर प्रश्न आहे की निवडून द्यायचे तरी कोणाला ? त्यामुळे या निवडणुकीशी आम्हाला सोयरसुतक नाही.एक सोपस्कार म्हणून आम्ही या निवडणुकीकडे बघतो.
२ ) सविता रायबोले,नोकरदार,
नालासोपारा प.
मी मूळची नाशिकची व सासर माझे पुण्याचे,नोकरीनिमित्त आम्ही मुंबईत आलो.त्यावेळी या भागात परवडणाऱ्या भावात फ्लॅट मिळत होते,म्हणून आम्ही नालासोपाऱ्यात बस्तान आपले मांडले.नाशिक/पुण्यासारखेच हे शहर असेल,अशी आमची भाबडी आशा होती.पण पहिल्याच वर्षी आमचे नालासोपारा शहर तीन ते चार दिवस पाण्यात बुडाले व आम्ही अक्षरशः नशिबाला दोष देत राहिलो.मात्र कालांतराने आम्हाला या अस्मानी संकटाची संवय झाली.कारण ही समस्या निपटून काढण्या इतपत क्षमता नगरसेवक व अधिकाऱ्यांमध्ये नाही,हे आम्हाला कळून चुकले होते.पाणीटंचाई तर आमच्या पाचवीला पुजलेलीच होती.टँकरच्या पाण्यासाठी पदरमोड करून आम्ही मेटाकुटीस आलो,पण ती करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.पिण्यासाठी बिसलेरीच्या मोठ्या बाटल्या व ** धुण्यासाठी टँकरचे पाणी, असा आमचा दिनक्रम सुरू राहिला,आजही त्यामध्ये बदल होऊ शकला नाही.जी महानगरपालिका पिण्यासाठी घोटभर पाणी देऊ शकत नाही,चालायला धड रस्ते बांधू शकत नाही,गेल्या पंधरा वर्षात साधे सरकारी रुग्णालय उभारू शकत नाही,तिला आपण महानगरपालिका म्हणू शकतो का ? भ्रष्टाचार कुठे व कसा करावा ? याचे रोलमॉडेल म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकाकडे बोट दाखवता येईल,इतकी या महानगरपालिकेची अवस्था झाली आहे.या महानगरपालिकेच्या भ्रष्ट व गलथान कारभाराविषयी बोलण्यासारखे खूप काही आहे,पण बोलून फायदा होणार असेल तर बोलते,पण तशी परिस्थिती नाही.कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच निघणार,जे सध्या चालू आहे,त्यामध्ये समाधान मानायचे,एवढेच आपल्या हाती आहे.
३) संदीप चोपडे,शिक्षक विरार,
या महानगरपालिकेकडून फारशा अपेक्षा नाहीत.कारण ज्या पद्धतीने सार्वजनिक पैश्याची लूट सुरू आहे,ती पाहता अपेक्षा करणे म्हणजे आपले डोके खडकावर आपटून घेण्यासारखे आहे.महानगरपालिकेचे दोन अधिकारी आजच्या घडीला गजाआड आहेत,वास्तविक त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारात त्यांच्या सोबत कोण कोण आहेत,त्यांची नावे त्यांनी उघड केली पाहिजेत.त्यांनी एकट्यानी शिक्षा भोगता कामा नये.गुजराती भाषेत एक म्हण प्रचलित आहे.” हूं तो मरिस,पण तने भी ** बनाविने मरिस,” या म्हणी प्रमाणे सगळ्यांची नावे तपास करणाऱ्या यंत्रणासमोर उघड केली पाहिजे.हे जे छुपे रुस्तम लोकांसमोर यायला हवेत.दुसऱ्यांना पुढे करून लूट करणारे गजाआड व्हायला हवेत.तरच या समाजातील अपप्रवृत्तीना आळा बसू शकेल.
४) सुयश पंचोली व्यापारी,नालासोपारा,
दर पावसाळ्यात आम्हा व्यापाऱ्यांचे लाखो रु.चे नुकसान होत असते.हे दुष्टचक्र गेली अनेक वर्षे सुरूच आहे.यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी या महानगरपालिकेकडे तज्ञ अधिकारी नाहीत.बदनाम ठेकेदार या महानगरपालिकेचे आधारस्तंभ,कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.रस्त्याच्या डागडुजी व दुरुस्तीची कामे कायम सुरू असतात,कारण यातून पैसा खायला मिळतो.रस्त्याची कामे न करता बिले काढणारी महानगरपालिका अशी
या महानगरपालिकेची ओळख आहे.दरवर्षी नालेसफाईच्या कामात कोटी कोटीची उड्डाणे होत असतात,पण कचऱ्यानी भरलेले नाले,शहरवासियांना वाकुल्या दाखवत असतात.आमचे नगरसेवक मात्र दहीहंडी,गोविंदा, हळदीकुंकू व गरबाचे आयोजन करण्यात धन्यता मानतात.दुसऱ्याच्या नावावर अनधिकृत बांधकामे उभारून आपली पोटे भरणारी या पिल्लावळी आहेत तरी कोण ? हे गजाआड असलेल्या अधिकाऱ्यांनी तपास यंत्रणाना सांगितले तर या सर्व उंदरांची पळापळ सुरु होईल.

