दीपक मोहिते,
जिल्हा परिषद/ पंचायत समिती,रणसंग्राम,वाडा तालुका,
वाड्याचा गड महायुती राखणार…
२००९ साली मतदारसंघाच्या फेररचनेत वाडा तालुक्याचा काही भाग भिवंडी तालुक्याला जोडला गेला.त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेचे क्षेत्र कमी झाले.सध्या या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ०६ गट आहेत तर पंचायत समितीचे १२ गण आहेत.
वाडा तालुका हा कृषीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यात भात लागवडीचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात आहे.तसेच भातपिकासोबत नागली व रब्बी हंगामात विविध पिके घेण्यात येत असतात.८० ते ९० % भूमिपुत्र शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.काही वर्षांपूर्वी तालुक्यातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने औद्योगिकरणाला चालना दिली,त्यानंतर काही गावात ” डी,” झोन अस्तित्वात आले.पण कामगार संघटनांचा उच्छाद,नागरी सुविधांचा अभाव व उद्योजकांची बुरसटलेली मानसिकता,अशा कारणामुळे तालुक्यात कारखानदारी वाढू शकली नाही.त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.परिणामी बेरोजगारीचा प्रश्न आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे.

तालुक्यात कुणबी व आदिवासी समाजाचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे.तालुक्यात होणाऱ्या वाडा कोलम तांदळाने येथील शेतकऱ्यांना आर्थिक वैभव मिळवून दिले,पण आज तो तांदूळ इतिहासजमा होऊ लागला आहे.हा जो बदल होत आहे,तो भविष्यात बेरोजगारीला आमंत्रण देणारा आहे.सन २००० मध्ये या तालुक्यात नागरीकरणाला प्रचंड वेग आला आणि तालुक्याची लोकसंख्या हा हा म्हणता दोन ते अडीच लाखाच्या घरात पोहोचली.त्यामुळे नागरी सुविधांचे अनेक प्रश्न उभे ठाकले.काही वर्षांपूर्वी राज्यसरकारने शहरी भागासाठी नगरपंचायतीची स्थापना केली,पण परिस्थितीत मात्र बदल होऊ शकला नाही.ग्रामीण भागातील भूमिपुत्र आजही उपेक्षित जीवन जगत आहेत.आदिवासी तालुका आदिवासी असल्यामुळे आर्थिक निधीची कमतरता नाही,पण योग्य नियोजनाअभावी त्याचा वापर होत नाही,त्यामुळे लोकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.या तालुक्यात,३१ वरसाळे,३२ गांधरे,३३ गालतरे,३४ खानिवली,३५ खुपरी व ३६ कुडूस,अशा सहा गटाचा समावेश आहे,त्याअंतर्गत १२ पंचायत समितीचे गण आहेत.या तालुक्यावर भाजपचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे.माजी पालकमंत्री स्व.विष्णू सवरा व त्यांचे चिरंजीव विद्यमान खा.डॉ.हेमंत सवरा यांचे हे होमटाऊन आहे.त्यामुळे भाजपने तालुक्यात गेल्या काही वर्षात बऱ्यापैकी पाय रोवले आहेत.मात्र गेल्या तीन वर्षात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तालुक्यात चांगली मुसंडी मारली आहे.जिजाऊ या सामाजिक संघटनेचे निलेश सांबरे यांनी नुकताच त्यांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे शिंदे गट काही अंशी मजबूत झाला आहे.भाजप व शिंदे गट महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले तर ते सर्वच्या सर्व जागा जिंकू शकतील,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

