दीपक मोहिते,
जिल्हा परिषद निवडणूक रणसंग्राम – डहाणू तालुका,
जिल्हा परिषदेच्या १३ गटात भाजप व मार्क्स. कम्यु.पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता,
डहाणू तालुक्यात पालघर जिल्हा परिषदेचे एकूण १३ गट तर डहाणू पंचायत समितीचे २६ गण आहेत.या व्यतिरिक्त शहरी भागासाठी डहाणू नगरपरिषद कार्यरत आहे.हा तालुका आदिवासीबहुल असल्यामुळे गट व गणाच्या बहुतांश जागा अनु.जमाती वर्गासाठी आरक्षित आहेत.तसेच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काही वर्षांपूर्वी सरकारने या तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यान्वित केला.या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विविध योजनाची अंमलबजावणी व आश्रमशाळाचे नियंत्रण करण्यात येत असते.या गटामधील स्थानिक रहिवाश्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.तालुक्याला समुद्रकिनारा लाभला असून अनेक गावांत मोठ्याप्रमाणात मासेमारी व्यवसाय करण्यात येतो.पूर्वेस भातशेती तर पश्चिमेस मासेमारी,अशा दोन व्यवसायात तालुक्याची विभागणी झाली आहे.यामध्ये ६ – बोर्डी,७ – आंबेसरी,८ – मोडगाव,९ – चळणी,१० – आंबोली,११ – भिसेनगर,१२ – चारोटी,१३ – आशागड,१४ – कैनाड,१५ – सरावली,१६ – चिंचणी,१७ – धाकटी डहाणू,१८ – दाभोण या १३ गटाचा समावेश आहे.

डहाणू रेल्वे स्थानक परिसर हा शहरी भाग म्हणून ओळखला जातो.गेल्या काही वर्षात या भागात मोठ्याप्रमाणावर नागरीकरण
झाले.अल्पावधीत लोकसंख्येतही लक्षणीय वाढ झाली.त्यामुळे प्रशासनाचा विकासाच्या बाबतीत या भागावर विशेष फोकस राहिला.२०२३ पर्यंत या तालुक्यात औद्योगिक बंदी होती,त्यामुळे उद्योगधंद्यांना
येथे चालना मिळू शकली नाही.त्यानंतर प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्प उभारणीसाठी केंद् सरकारने ही औद्योगिक बंदी उठवली.त्यामुळे येणाऱ्या काळात या तालुक्याला सुगीचे दिवस येणार आहेत.गेली अनेक वर्षे ग्रामीण भागात अठरापगड दारिद्र्य होते.भातशेती व बागायती उत्पन्न यावर आदिवासी समाजाचा उदरनिर्वाह चालायचा.पण वाढवण बंदर उभारणीच्या कामामुळे उद्योगवाढीला बऱ्यापैकी चालना मिळणार आहे.मात्र त्याचा विपरीत परिणाम कृषी व बागायती क्षेत्रावर होईल,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या तालुक्यात काही वर्षांपूर्वी एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते.पण या तालुक्याला तलासरीचा परिसर जोडण्यात आला व मार्क्स.कम्यु.पक्षाने तालुक्यावर कब्जा मिळवला.मात्र दुसरीकडे भाजपनेही या तालुक्यात आपले पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते,त्यांना शहरी भागात बऱ्यापैकी यश मिळाले आज डहाणू नगरपरिषद भाजपच्या ताब्यात आहे.तसेच २०१४ साली भाजपने विधानसभेची जागा जिंकून आपले खाते उघडले होते,पण त्यांचा हा आनंद केवळ अल्पकाळच टिकला.त्यानंतर २०१९ व २०२४ असे सलग दोनवेळा मार्क्स.कम्यु.पक्षाने बाजी मारली.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ.हेमंत सवरा यांनी या विधानसभा मतदारसंघात चांगली मते घेत सेनेच्या भारती कामडी यांना धूळ चारली.पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मार्क्स.कम्यु.पक्षाचे कॉ.विनोद निकोले यांनी भाजपच्या उमेदवाराचा फार कमी मतांनी पराभव करत जागा टिकवून धरली.या निवडणुकीतही मार्क्स.कम्यु.व भाजप यांच्यामध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

