दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१३,
या प्रभागात स्थानिक मतदार भाजपला संधी देतील,अशी शक्यता आहे…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकासंदर्भात नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे कान चांगलेच उपटले.त्यामुळे या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्याव्या लागणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्यासंदर्भात आयोगाला कालमर्यादा घातल्यामुळे महायुतीचे तीन घटक पक्ष वगळता इतर तमाम राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.या निर्णयामुळे गेल्या पाच वर्षांपासून निर्माण झालेली अनिश्चितता आता दूर झाली आहे.
असो,गेल्या भागात आपण प्रभाग क्र.१२ च्या प्रभागातील विकासकामाचा आढावा घेतला.आज स्थानिक भूमीपुत्रांचा प्रभाग अशी ओळख असलेल्या प्रभाग क्र.१३ चा आढावा घेणार आहोत.यंदा या प्रभागाला अन्य काही नवीन परिसर जोडण्यात आले आहेत.या प्रभागात हिंदू व ख्रिस्ती अशी संमिश्र लोकवस्ती आहे.या प्रभागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे.येथील सामवेदी समाज हा भाजपला मानणारा म्हणून ओळखला जातो.पण पाच वर्षांपूर्वी भाजपचे अस्तित्व नगण्य राहिल्यामुळे या समाजाने आजवर बहुजन विकास आघाडी व शिवसेनेला साथ दिली.पण हा समाज बहुजन विकास आघाडीचा कधीही पाठीराखा झाला नाही.ग्रामीण भागातील गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात जो आगडोंब उसळला व त्यातून पोलिसांनी येथील भूमीपुत्रांवर केलेल्या अत्याचाराचे वण अद्याप नाहीसे होऊ शकलेले नाहीत.त्याचा राग आजही या प्रभागातील स्थानिक जनतेमध्ये धुमसत आहे.त्यामुळे या प्रभागात यावेळी भाजपला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.येथील हिंदू समाजात सामवेदी,भंडारी व काही प्रमाणात आदिवासीचा समावेश आहे,तसेच ख्रिस्ती समाजात कुपारी व वाडवळ अशा दोन पोटजातींचा समावेश आहे.प्रभागात एकूण ४२ हजार ४०६ मतदार आहेत.त्यापैकी ६९२ अनु.जाती व २ हजार ९२९ अनु.जमातीचे मतदार आहेत.या प्रभागाचे क्षेत्र फार मोठे असून त्यामध्ये वाघोली,वाघेश्वरी तलाव,नाळे,साईनाथ पाडा,भंडार आळी,कोंडा आळी,पाटील आळी,नाळे गाव,मानपे गाव,गास,नवाळे,
गोमरसाळे,मरदेस चर्च,एकविरा मंदिर,नाळे तलाव,राजोडी,राजोडी बीच,जॉयव्हीला,नंदाखाल,तोरभाट,टाकीपाडा, नानभाट,सितारभाट, उमराळे पश्चिम परिसर,जे. पी.नगर,बोळींज गाव परिसर,फर्नाड आळी व
गोटे भाट,अशा प्रचंड क्षेत्रफळाचा समावेश आहे.प्रचंड क्षेत्रफळ व लोकसंख्या लक्षात घेता हा प्रभाग विकासाच्याबाबतीत बाळसें धरू शकला नाही.विकासाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. नगरसेवकांची निष्क्रियता त्यास जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे या प्रभागात मतदार यावेळी भाजपला डोक्यावर घेतील,असा अंदाज आहे.

