दीपक मोहिते,
तिसरे महायुद्ध दक्षिण आशिया खंडात होण्याची शक्यता,
गेल्या ७५ वर्षात अमेरिकेला अनेक देशात मानहानी पत्करत माघार घ्यावी लागली. त्यामध्ये अफगाणिस्तान, व्हियेतनाम,इराक,या देशांचा समावेश होता. सोव्हीयत रशियाचे विघटन झाल्यानंतर अमेरिकेने मध्यपूर्व देशात विस्तारवादी धोरण राबवण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना याप्रकरणी फारसे यश मिळाले नाही.या देशातील कट्टरवादी टोळ्यांनी अमेरिकेची डाळ शिजू दिली नाही. सैन्यावर होणारा अमाप खर्च व आपल्या जवानांचे जाणारे बळी,अशा दोन कारणामुळे अमेरिकन जनतेमध्ये रोष वाढला व अमेरिकेने या देशातील आपले सैन्य माघारी बोलावले. पण त्यानंतरही अमेरिकेची खुमखूमी काही कमी झाली नाही. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्हाल्दीमीर पुटीन यांच्या कणखरपणापुढे त्यांचे काही चालले नाही.रशियाला अधिक कमकुवत करण्यासाठी अमेरिकेने ” नाटो,” ही बहुराष्ट्रीय संघटना उभारली. सध्या या संघटनेच्या माध्यमातून अमेरिका रशियाला रोखण्याचे अमेरिका सातत्याने प्रयत्न करत असतो. युक्रेनला सर्वोतोपरी मदत, पॅलेस्टाईन व इस्त्रायल संघर्षात इस्त्रायलची तळी उचलणे,भारताविरोधात पाकिस्तानला रसद पुरवणे, बांगला देश व नेपाळ या दोन देशांना आपल्याविरोधात फूस लावणे,आपली अर्थव्यवस्था विस्कळीत करण्यासाठी वाढीव टॅरिफ लागू करणे, नुकत्याच झालेल्या युद्धात पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहणे व रशियाकडून भारताला स्वस्त दरात उपलब्ध होणारे तेल खरेदी करू न देणे, असे सर्रास प्रकार ट्रम्प प्रशासनाने चालवले आहेत. अशाप्रकारचे कटू अनुभव आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री जयशंकर या दोघांचे आता डोळे उघडले आहेत.मोदी अमेरिकेत जावून
” अबकी बार ट्रम्प सरकार,” असे जे कोकलत असायचे,ते बंद झाले आहेत. आजवर अमेरिकेच्या प्रत्येक प्रशासनाने आपल्या विरोधात पाकिस्तानला बळ दिले.मोदी यांनी चुकीच्या पद्धतीने परराष्ट्र धोरण राबवत आपला पारंपारिक मित्र असलेल्या रशियाला दुखावले. नुकत्याच झालेल्या युद्धात ट्रम्पने आपल्या पाठीत सुरा खुपसल्यानंतर मोदी आता भानावर आले आहेत.तीन वर्षांपूर्वी
अफगाणिस्तानातुन आपले सैन्य माघारी घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्यामुळे दक्षिण आशिया खंडावर त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.तालिबान,रशिया,पाकिस्तान व चीन,यांचे एकत्र येणे,आपल्याला धोकादायक ठरू शकते.ज्या पाकिस्तानला आजवर प्रचंड प्रमाणात अमेरिकेने रसद पुरवली तो पाकिस्तान,आता चीन व रशियाच्या नादी लागला आहे.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या नादी लागून आपल्या मोदी सरकारने अफगाणिस्तानात विविध प्रकल्प उभारण्याकामी हजारो कोटी रु.ची गुंतवणूक केली आहे.त्या देशाच्या संसदेची वास्तू देखील आपण ७०० कोटी रु.खर्चून उभारली आहे.ही सारी गुंतवणूक आता इतिहासात जमा झाली आहे.भविष्यात काय होईल,याचा अंदाज कोणालाच नसतो.पण गेल्या काही वर्षात अमेरिकेचे वागणे,लक्षात घेऊन आपल्या सरकारने सारासार विचार करायला हवा होता.अमेरिकेच्या सांगण्यावरून आपल्या सरकारने अशाप्रकारची प्रचंड गुंतवणूक केली,पण आज आपल्या हाती धुपाटणे आले आहे.
१९४७ ते २०१४,सुमारे सहा दशके जीवाभावाचे मित्र असलेले भारत व रशिया,हे दोन्ही देश एकमेकांपासून गेल्या बारा वर्षांपासून दुरावले होते.मोदीचे डोळे उघडल्यामुळे आता मोदी यु-टर्न करण्याच्या प्रयत्नात आहेत गेली आठ दशके अमेरिकेने पाकिस्तानला हाताशी धरत आपल्या विरोधात प्रचंड कारवाया केल्या.१९७१ च्या भारत-पाक युद्धात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन व परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर,या दोघांनी आपल्या विरोधात सातवे आरमार पाठवले होते.ज्या दिवशी सातवे आरमार आपल्या दिशेने निघाले,त्याचवेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रातोरात मॉस्को गाठले व त्यावेळचे रशियाचे पंतप्रधान अँलेक्सी कोसीजीन यांची भेट घेतली व रशिया आपल्या मैत्रीला जागला.अमेरिकेच्या विरोधात रशिया आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.त्यानी अमेरीकेच्या सातव्या आरमाराला रोखण्यासाठी भारताला कुमक धाड ली.रशियन आरमार भारताच्या दिशेने निघाल्याचे अमेरिकेला कळताच अमेरिकेने काढता पाय घेतला.हा इतिहास सांगण्याचे कारण असे की आज आपण अमेरिकेच्या नादी लागून
रशियासारखा चांगला मित्र गमावला होता.चीन,पाक,
अफगाणिस्तान व रशिया,या चौघाचे एकत्र येणे,आपल्याला त्रासदायक ठरू शकते.कालांतराने या साखळीत इराण,इराक,सीरिया,
जॉर्डन,
तुर्कस्तान ही मुस्लिम राष्ट्रे देखील सहभागी होतील.कारण ही सर्व राष्ट्रे अमेरिकेच्या दादागिरीमुळे यापूर्वीच विरोधात उभी ठाकली आहेत.अशा परिस्थितीमध्ये भारत एकाकी पडणार आहे.त्यामुळे मोदी सरकारला आता उपरती झाली असुन त्यांनी परराष्ट्र विषयक धोरणात बदल केला आहे.अमेरिका व इस्त्रायल या दोन राष्ट्रावर या सर्व घडामोडींचा फारसा परिणाम जाणवणार नाही.आपल्याला मात्र खूप काही सहन करावे लागणार आहे.अफगाणिस्तानच्या प्रश्नावरून रशिया,चीन समर्थक विरुद्ध अमेरिका समर्थक आपण व इस्त्रायल,अशी विभागणी होऊन पुन्हा शीतयुद्धाला सुरुवात होणार आहे.त्यामुळे मोदी यांनी सारासार विचार करण्याची गरज आहे.
या शीतयुद्धाचे रूपांतर जर प्रत्यक्ष युद्धात झाले तर ते तिसरे जागतिक महायुद्ध ठरू शकते.यापूर्वी पहिले महायुद्ध हे १९१४ ते १९१८ तर दुसरे महायुद्ध १९३९ ते १९४५ या दरम्यान झाले,तिसरे महायुद्ध जर झालेच तर ते दक्षिण आशियातच होईल.सध्या हा टापू अतिसंवेदनशील असा बनला आहे.

