दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
जरांगे पाटलांनी मुंबईकर जनतेची सहानुभूती गमावली,
मराठ्यांचे नेते जरांगे पाटील यांना त्यांच्याच साथीदारांनी सध्या अडचणीत आणले असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.जरांगे पाटील यांनी लाखो आंदोलकांना मुंबई आणून आपली ताकद दाखवून दिली.पण आता त्यांनी न्यायालय व मुंबईकरांची सहानुभूती पार गमावली आहे.आरक्षणाचा प्रश्न हा कधीही ताकदीच्या जोरावर सुटू शकणार नाही,हे जरांगे पाटील यांनी लक्षात घ्यायला हवे होते.
मुंबई शहर हे गेल्या चार दिवसापासून कोमात गेले आहे.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दिवसाकाठी कोट्यवधी रु.आर्थिक उलाढाल होत असते.मुंबई म्हणजे अंतरवाली सराट नव्हे,हे शहर दररोज फक्त दोन तास झोपत असते.अशा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराचे आर्थिक व्यवहार सलग चार दिवस ठप्प होणे,ही बाब न्यायाला धरून नाही.जरांगे यांच्यासोबत जे आंदोलक मुंबई शहरात दाखल झाले,त्यांनी गेल्या चार दिवसात जीवाची मुंबई केली.भररस्त्यावर कुस्तीचा फड लावणे,लेझीम खेळणे,बॅरिकेट्सचा वापर वाहनासारखे करणे,चौपाटी,गेट वे,सार्व. गणेशोत्सव मंडळाना भेटी देणे,रेल्वे स्थानकावर ठाण मांडणे,उघड्यावर आंघोळ करणे,असे प्रकार सुरू केले.आपली ताकद दाखवण्यासाठी तसेच सरकारला अडचणीत आणण्यासाठी जरांगे यांच्या आंदोलकांनी मुंबईकरांचे जीवन पार विस्कळीत करून टाकले.अखेर काल मुंबई उच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली व राज्य सरकारला चांगलेच फटकारले.मोठ्या संख्येने लोक मुंबई शहरात दाखल होत असताना सरकारने कारवाई का केली नाही,त्यांना मुंबईच्या वेशीवर का रोखण्यात आले नाही.परवानगी नसताना ध्वनिक्षेपकाचा सर्रास वापर करण्यात आला,रस्त्यावर हैदोस घालण्यात आला,लोक उघड्यावर आंघोळ करत होते,सरकारने कारवाई का केली नाही,असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला व आज दुपारी १२.०० वाजेपर्यंत आंदोलकांना शहराच्या बाहेर काढा,असे स्पष्ट शब्दात सुनावले.आता खरी कसोटी जरांगे पाटील यांची आहे.हे आंदोलन आता त्यांच्या हातून निसटत चालले आहे.त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी आंदोलनाचे नियोजन केले,ते चुकीच्या पद्धतीने केले,त्यामुळे या आंदोलनाचा फियास्को होणार आहे.आज पोलीस बळाचा वापर करत आंदोलकांना शहराबाहेर पिटाळतील,अशी शक्यता आहे.त्यामुळे पोलीस व आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.तसे झाल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर होईल.जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला या आंदोलनाचे नियोजन योग्य पद्धतीने करता आले नाही.आंदोलनाचा मूळ उद्देश बाजूला ठेवत आंदोलकांनी पिकनिक एन्जॉय केली.सरकार आपल्या आरक्षणप्रश्नी काय भूमिका घेत आहे,याच्याशी आंदोलकांना कसलेही देणेघेणे नाही,हे त्यांच्या वागण्यावरून पाहायला मिळाले.त्यांनी हे आंदोलन म्हणजे आनंदोत्सव म्हणून साजरा केला.त्यामुळे या आंदोलनातून जरांगे पाटलांच्या हाती काहीही लागणार नाही.उलट या अशा त्रासदायक ठरलेल्या आंदोलनाने जरांगे पाटील यांनी मुंबईकर जनतेची सहानुभूती मात्र नक्कीच गमावली आहे.

