दीपक मोहिते,
विरार दुर्घटना ; संबंधित अनधिकृत बांधकाम व्यवसायिकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनास्थळाची पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला तसेच राज्य शासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रु.ची मदत जाहीर केली.
यावेळी खा.डॉ.हेमंत सवरा, आ.स्नेहा दुबे,आ.राजन नाईक,वसई-विरार महानगरपालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी तसेच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला, २६ ऑगस्ट रोजी विरार पूर्वेस मध्यरात्री विजयनगर येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा भाग कोसळून सदर दुर्देवी घटना घडली.या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६ महिला,८ पुरुष व ३ बालकांचा समावेश आहे. तसेच ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल दुर्घटनास्थळाला भेट दिली व मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.तसेच जखमी नागरिकांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांनी विरारमधील प्रकृती रुग्णालयात भेट दिली व जखमीवर करण्यात येणाऱ्या उपचाराचा आढावा घेतला.
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” सी,” चंदनसार मधील चामुंडानगर, स्वामी समर्थ नगर, विजयनगर,नारंगी रोड,विरार (पू.) येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा मागील भाग मंगळ.२६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अचानक कोसळला. याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.महानगरपालिकेच्या कर्मचारी,एन.डि.आर.एफ.चे कर्मचारी,महसूल प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाने वेगाने मदतकार्य सुरु केले.
सदर इमारतीमध्ये एकूण ५० सदनिका आहेत.त्यापैकी सदर इमारतीचा पाठीमागचा भाग ( अंदाजे १२ सदनिका ) कोसळला.या इमारतीपासून बाजूला असलेल्या चाळींना व इतर इमारतीनाही धोका असल्याने तेथील रहिवाश्यांना तात्काळ स्थलांतरीत करण्यात आले तसेच शेजारी असलेल्या चाळीतील आठ खोल्या पाडून यंत्रसामुग्री आत जाण्यास जागा करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार करणेबाबत पालिका प्रशासनाकडून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत करण्यात आली.काही व्यक्तींचे मृतदेह त्यांच्या मुळ गावी नेण्याचीही व्यवस्था महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली.सुरक्षेच्या दृष्टीने रमाबाई अपार्टमेंट इमारतीच्या बाजुची इमारत व आजुबाजुच्या चाळींमधल्या खोल्या देखील रिकाम्या करुन तेथील नागरीकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. महानगरपालिकेतर्फे या सर्व बाधीत नागरीकांची तात्पुरती राहण्याची व भोजनाची सोय समाज मंदीर विरार पुर्व येथे करण्यात आली असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बांधकामास जबाबदार असणारा जमीन मालक आणि विकासकाविरुध्द महानगरपालिकेने विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. ४८०/२०२५ अन्वये दाखल केला असुन आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
तसेच दुर्घटनेत प्रभावित झालेल्या नागरिकांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे,असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून, मदतकार्यासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
दरम्यान या दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात येत आहे.संबंधित अनधिकृत बांधकाम व्यवसायिक व जमीन मालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.मात्र याप्रकरणी पोलिसांनी जी कलमे लावली आहेत,ती लक्षात घेता या गुन्हेगारांना जामीन मिळण्यात कोणत्याही अडचणी येणार नाही.पोलिसांनी या गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवध व एम.आर. टी.पी.कायद्यातंर्गत असलेली कलमे लावण्याची गरज होती. पण,हे अनधिकृत बांधकाम व्यवसायिक कोणत्या न कोणत्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित असतात, त्यामुळे अशा प्रकरणात पोलीस ” सेटिंग, ” करतात व हे गुन्हेगार अल्पावधित जमिनावर बाहेर येत असतात. सरकारने त्यांच्यावर केवळ गुन्हे दाखल करून थांबता कामा नये,मृतांच्या वारसाना जशी आर्थिक मदत सरकारने दिली,तेवढीच रक्कम सरकारने १७ निष्पाप रहिवाशीयांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या या समाजकंटकाकडून वसूल करून पीडिताना मिळवून दिली पाहिजे.अशाप्रकारचा कायदा सरकारने केल्यास वसई – विरार भागातील अनधिकृत बांधकाम व्यवसायिकाना वचक बसू शकेल,अन्यथा ” ये रे माझ्या मागल्या, ” असेच होत राहील.

