दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजपमध्ये जाणाऱ्यांची अवस्था निवडणुकीनंतर जेवणाच्या ताटाबाहेर फेकलेल्या कडीपत्याच्या पानासारखी होईल…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चाहूल लागल्यानंतर भाजपने आपले वापरात असलेले अस्त्र बाहेर काढले आहे.गेल्या महिनाभरात भाजपने बहुजन विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्याना आपल्या गळाला लावले व आजही ती प्रक्रिया सुरूच आहे.बहुजन विकास आघाडीला भ्रष्टाचाऱ्याचा पक्ष म्हणून भाजप एकेकाळी हिणवत असे,आज तोच भाजप,बहुजन विकास आघाडीतील हवशे नवश्याना गोळा करण्यात दंग आहे.त्यासाठी त्यांनी भलीमोठी वॉशिंग मशीन आणून ठेवली आहे.पण,या लोकांना कितीही वेळा मशीनमध्ये टाकले तरी त्यांच्या अंगावरचा मळ कधीच खाली बसणार नाही.येणाऱ्या काळात अनेक बदनाम माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून त्यांना गवसणी घालण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे.भ्रष्टाचाराबाबत काळेकुट्ट चेहरे असलेले हे महाभाग भाजपमध्ये गेले तरी त्यांचे चेहरे आहे,त्याच स्थितीत राहणार आहेत.ते कदापी स्वच्छ होणार नाहीत.उलट या सर्वांना भाजपने आपल्या मशीनमध्ये टाकल्यास ट्रिप होऊन मशीनच बंद पडण्याची शक्यता अधिक आहे.
ज्या माजी नगरसेवकांच्या प्रवेशासाठी भाजपचे नेते स्वागताचे ताट घेऊन उभे आहेत,त्यांच्या नावावरून एक नजर फिरवली तर आपली बोबडीच वळेल.या लोकांचा भाजपला फायदा होईल,अशीही स्थिती नाही.पण त्याना बाजूला घेऊन ” बविआमुक्त वसई,” करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ही सारी धडपड सुरु आहे.त्यामुळे ज्या पक्षाने आपल्याला आर्थिक सुबत्ता व स्थिरता मिळवून दिली,त्या पक्षाशी प्रतारणा करणे,हे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे.जी लोकं भूतकाळात भ्रष्ट लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठवत असायचे,तेच लोक आज आपल्या स्वागतासाठी पायघड्या घालून उभे राहतात,यामागचे मर्म, भाजपमध्ये जाणाऱ्या या लोकांनी ओळखायला हवे.तुमच्यावर अतीव प्रेमापोटी ते तुम्हाला मिठ्या मारताहेत,असे बिलकुल नाही.त्यांचा अंतस्थ हेतू या मंडळींनी ओळखला पाहिजे.या पक्षाचे जगद्गुरू मोदी यांनी देखील २०१४ साली ” काँग्रेसमुक्त भारत,” चे स्वप्न पाहिले होते.पण गेल्या बारा वर्षात त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले नाही.पण सध्या ” भाजपमुक्त भारत,” ची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे पावलोपावली पाहायला मिळत आहे.त्यामुळे आज आपल्या मूळ पक्षाला सोडून भाजपच्या कच्छपी लागणे,हे आत्महत्या करण्यासारखे आहे.तुम्ही सार्वजनिक जीवनात स्वच्छ चारित्र्य किंवा उजळ प्रतिमा असणारे लोकप्रतिनिधी म्हणून भाजपला हवेसे आहात,असे जर जाणाऱ्यांना वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत,असे म्हंटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.बहुजन विकास आघाडीला कमकुवत करून महानगरपालिका ताब्यात घ्यायची,असा एकमेव उद्देश या सर्व घडामोडीमागे आहे.आज तुम्ही त्यांचे आवडते आहात,पण उद्या निवडणुका संपल्या की कधी नावडते व्हाल,हे तुम्हालाही कळणार नाही.त्यावेळी तुमची अवस्था ताटाबाहेर फेकलेल्या कडीपत्याच्या पानासारखी झालेली असेल.

