दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
गणराया तूच बघ रे बाबा…
आज रस्त्याच्या महासंकटातून स्वतःला सांभाळत आमच्या गणरायाचे सुरक्षितपणे आगमन कसेबसे तरी झाले एकदाचे.बाप्पा आपल्या घरी सहीसलामतपणे पोहोचल्यामुळे गणेशभक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
पण हा आनंद केवळ दीड,पाच व अकरा दिवस टिकणारा आहे,याचे भान आमच्या गणरायाला आहे,तसेच त्यांच्या भक्तांना देखील आहे.आज भक्तांच्या घरी आगमन करताना गणरायाला अनेक मानवनिर्मित संकटाला सामोरे जावे लागले.दरवर्षी गणेशाच्या आगमन होण्यापूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी,हे आढावा बैठकीचे आयोजन करत असतात.या बैठकीत विविध विभागाचे अधिकारी,रस्त्याची कामे करणारे ठेकेदार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतात.सदर बैठकीत गरमागरम चर्चा होते.प्रशासनातील अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता,ठेकेदाराची मिलीभगत व राजकीय पदाधिकाऱ्यांची उदासीनता करदात्यांना पाहायला मिळते.वास्तविक अशा बैठकीतून काय निष्पन्न होते,हे त्या बिचाऱ्या गणरायालाच माहीत असावे.वर्षानुवर्षे या अशा आढावा बैठका होत असतात.पण रस्त्यावरील खड्डे बुजण्याऐवजी त्यांच्या संख्येत सतत वाढच होत असते.तरी देखील या अशा बैठका होतच राहतात.त्यामुळे गणराय देखील अशा बैठकांकडे दुर्लक्ष करत असतो.यंदाही आपल्याला जीव मुठीत धरून आपल्या भक्ताच्या घरी जावे लागणार आहे,हे गृहीत धरून तो आपल्या मनाची तयारी ठेवतो.खड्डे कायमचे बुजवले तर आपली उपासमार होईल,हे अधिकारी,ठेकेदार व राजकीय नेते जाणून आहेत.त्यामुळे गणराय व भक्तांना या अशा बैठकीतून आपल्या भल्याचे काही होणार नाही,हे ठाऊक असते.हा एक औपचारिक सोपस्कार असतो,तो अधिकारीवर्ग नित्यनेमाने पार पडत असतो.
असो,स्वतःला सांभाळत आपल्या लाडक्या गणरायाचे सुरक्षितपणे आगमन झाले,याचेच आम्हा गणेशभक्तांना समाधान आहे.गणरायाला आमचे साकडे आहे की तुम्ही आलात,आता दीड,पाच किंवा अकरा दिवस निवांतपणे आमच्याकडे राहा,त्यांनतर जाताना तुम्हाला सुरक्षितपणे विसर्जनस्थळी नेण्याची जबाबदारी आम्हा भक्तांची आहे,आम्ही नक्कीच ती नेटाने पार पाडू,

