दीपक मोहिते,
समाज माध्यमावर धुमाकूळ ; ” चलता है,चलने दो,”
प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर अर्वाच्च भाषेत टीका टिप्पणी करत असतात.वास्तविक ही टीकाटिप्पणी मतदारांसाठी मनोरंजनाचे साधन असते.मतदार त्यावरून आपले ” मत कोणाला ? ” हे ठरवत नसतो.पण कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र सतत वाढत असतो.एकीकडे अशाप्रकारची धुमश्चक्री सुरू असताना दुसरीकडे नेतेमंडळी मात्र निवडणुकीतील मतांची गोळाबेरीज व विजयाची गणिते जुळवण्यात गर्क असतात.वसईत सध्या तेच चालले आहे.
समाजमाध्यमावर कार्यकर्ते सध्या एकमेकांची उणी दुणी काढण्यात धन्यता मानत आहेत.टीका टिप्पणीचा हा खेळ निवडणूक होईस्तोवर चांगलाच रंगत असतो.एकदा का निवडणुका संपल्या कि जेवणातील कडीपत्याना जसे ताटाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो,तसे या कार्यकर्त्यांचे होत असते.ते मग पुन्हा पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत उगवतात.यालाच आपण जगरहाटी,असे म्हणत असतो.रस्ते,गटार बांधकाम,
गटारावरील झाकणे,नालेसफाई,नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसवणे,इ.सरकारकडून होणाऱ्या विकासकामांचे श्रेय मिळवण्यासाठी या काळात २४×७ असे कार्यकर्ते धडपडत असतात.घरात आपल्या आईला किंवा पत्नीला साधी कोथंबीर आणून न देणारे,हे महाभाग आपल्या नेत्यांसाठी जीवाचे रान करत असतात.त्यांचा हाच नेता,निवडणूक आटोपली की त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही.या निवडणुकी नंतरच्या काळात त्यांची अवस्था जेवणाच्या ताटातील कडीपत्याच्या पानासारखी होत असते.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एकदा शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आपल्या मिश्किल भाषेत म्हणाले होते,” आयुष्यभर शिवसैनिक म्हणून कार्यरत राहू नका,कधीतरी बाळासाहेब ठाकरे होण्याचा देखील प्रयत्न करा,” अर्थात त्यांनी हे वाक्य आपला शिवसैनिक मोठा झाला पाहिजे,असा,उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून म्हंटले होते.पण आज नेमकी उलटी परिस्थिती पाहायला मिळत आहे.आपण पक्षासाठी किती धडपडतो,आपल्या विरोधकांना किती शिव्याशाप देतो,पक्षावर होणारी टीका ही आपल्यावर होत असल्याचे गृहीत धरून समोरच्यावर कसे पलटवार करतो,हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नजरेस पडावे,यासाठी या कार्यकर्त्यांची धडपड असते.एरवी निवडणुकीनंतर साडेचार वर्षे राजकीय कुरुक्षेत्रावर निरव शांतता असते.उर्वरित सहा महिन्यात हे सारे उंदीर बिळाबाहेर पडतात व त्यांच्या गावगोंगाटाला तोंड फुटते.सध्या वसईच्या क्षितिजावर हेच चालले आहे.समाजमाध्यमावर काही कार्यकर्ते मंडळी जो काही धुमाकूळ घालत आहेत,त्यांमध्ये संवेदना कमी आणि उथळपणा अधिक असल्याचे जाणवते.सर्वसामान्य माणूस मात्र या सर्व घडामोडीकडे ” चलता है,चलने दो,” अशा दृष्टिकोणातून पाहत असतो.

