दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मराठा समाजाच्या मोर्च्याची फलनिष्पत्ती कशी असेल,हे सांगणे कठीणच आहे,
सात वर्षांपूर्वी एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाना शिक्षा व्हावी,यासाठी मराठा समाज एकवटला होता व त्यांनी मुंबईत न भूतो न भविष्यती,अशा क्रांती मोर्चा काढला होता.या मोर्चात सुमारे दीड लाख लोक सामील झाले होते.या प्रकरणी आम्हा मराठ्यासह अन्य समाज बांधवांच्या भावना देखील तीव्र होत्या.या मोर्च्यादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.पोलीस यंत्रणेवरही ताण पडला नाही.त्यावेळी मुंबईच्या नागरिकांना या मोर्च्याच्या रूपाने शिस्तबद्ध,संयम व शांतता,असा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला.या घटनेची दखल जगभरातील देशांनी घेतला.मराठा समाज आक्रमक असला तरी तो कधीच स्वकीयाविरोधात नसतो,हे या समाजाच्या आजवरच्या वाटचालीवरून सिद्ध झाले आहे.पूर्वजांनी समाजावर केलेले संस्कार,समाजात असलेली सहिष्णुता व साक्षरता,यामुळे आजवरची सर्व आंदोलने शांततापूर्ण मार्गाने झाली.गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजातर्फे आरक्षण प्रश्नी आंदोलने सुरू आहेत.मराठ्यांचे एकत्र येणे,हे भविष्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता गृहीत धरून फडणवीस व शिंदे यांच्या महायुती सरकारने गेल्या तीन ते चार वर्षांपासून अत्यंत गलिच्छ असे राजकारण केले.मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना वश करण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी ठरला व आरक्षणाचा प्रश्न हा अडगळीत पडत गेला.समाजाच्या नेत्यानी आपल्या वेगवेगळ्या चुली मांडल्या.सात वर्षांपूर्वी निघालेल्या पहिल्या विशाल मोर्च्यानंतर सुमारे तीस ते चाळीस मोर्चे निघाले,पण त्या सर्व मोर्च्यात एकजीनसीपणा नव्हता.त्यामुळे आंदोलनाची धार कमी होत गेली.अखेर तीन वर्षांपूर्वी एका खेड्यातील फाटक्या तरुणांकडे समाजाचे नेतृत्व चालून आहे.निराशेच्या खाईत सापडलेल्या मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने एक आशेचा किरण दिसू लागला.त्यांनी समाजाच्या गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण व नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावे यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.सततच्या उपोषणाने त्यांचे शरीर जर्जर झाले,पण ना शिंदे ना फडणवीस सरकारच्या हृदयाला पाझर फुटला. उलट या आंदोलनाच्या विरोधात फडणवीस यांनी ओबीसी समाजाला उतरवले व त्यांची खेळी यशस्वी ठरली.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोळा स्वभाव असलेल्या जरांगे यांची फसवणूक करण्यात धन्यता मानली व गेले दीड वर्षे आंदोलनात एकप्रकारची मरगळ आली.जरांगे पाटील हा तरुण पैश्याने जरी फाटका असला तरी त्याची समाजच्याप्रती असलेली तळमळ व धडपड याविषयी त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही.त्यांनी येत्या २९ ऑगस्ट रोजी पुन्हा मोर्च्याचे रणशिंग फुंकले आहे.त्यांच्या या घोषणेनंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ,हाके व तायवाडे,हे त्रिकुट सक्रिय झाले आहेत.सध्याचे फडणवीस सरकार हे ओबीसी समाजाचे कट्टर तारणहार आहेत.राज्यातील शेकडो जाती या ओबीसी समाजात विखुरल्या गेल्या आहेत.हा समाज कायम भाजपची कायम पाठराखण करत आला आहे.त्यामुळे या समाजाला दुखावणे,फडणवीस यांना परवडणारे नाही.२९ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या या मोर्च्याची फलनिष्पत्ती कशी असेल,हे सांगणे जरा कठीणच आहे.

