दिपक मोहिते,
महायुतीमध्ये मिठाचा खडा,
भाजपने प्रकाश निकम याना पक्षात घेऊन शिंदे गटावर एकप्रकारे सूडच उगवला,
गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते व पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन चांगलाच सूड उगवला आहे.त्यामुळे शिंदे गटाचे स्थानिक नेत्यांच्या अंगाचा तिळपापड झाला आहे.त्यांच्या जिल्हाप्रमुखानी भाजपने असे फोडाफोडीचे राजकारण,यापुढे असेच सुरू ठेवल्यास आम्हीही त्याला जसेच्या तसेच उत्तर देऊ,अशी थेट धमकी दिली आहे.

पालघर येथे शिंदे गटाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अशाप्रकारची धमकी दिली.पण त्यावर भाजपकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
राज्यात महायुती असली असली तरी स्थानिक पातळीवर शिंदे गट व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने आजवर कधीच जुळली नाहीत.पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेची एक तर विधानसभेच्या चार जागा स्वतःकडे खेचून घेतल्या,तेव्हापासून या दोघांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.हे सर्व रामायण घडत असताना गेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी निवडणूक लढवली.येथे झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे माजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री कपिल पाटील यांचा अनपेक्षितरीत्या पराभव झाला व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे निवडून आले.कपिल पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय,त्यामुळे त्यांचा झालेला हा पराभव फडणवीस व चव्हाण यांच्या जिव्हारी लागला होता.तत्पूर्वी वाडा – भिवंडी राज्यमार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात ठेकेदार निलेश सांबरे यांच्या विरोधात नागरिकांच्या असंख्य तक्रारी आल्या होत्या.त्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भाजपचे आ.प्रवीण दरेकर यांनी सभागृहात चर्चा उपस्थित केली होती.त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री असलेल्या रविंद्र चव्हाण यांनी कारवाईचे आदेश दिले होते.तेव्हापासून शिंदे गट व भाजपमध्ये स्थानिक पातळीवर धुसफूस सुरू झाली होती.या निलेश सांबरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत चांगलीच रसद पुरवली होती,हे लपून राहिले नाही.त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रविंद्र चव्हाण यांनी प्रकाश निकम व त्यांचे असंख्य समर्थकांना आपल्या गळाला लावले.तत्पूर्वी महायुतीचे सरकार आल्यानंतर शिंदे यांनी प्रकाश निकम यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊ केले होते.अडीच वर्षे अध्यक्षपदी राहिलेल्या प्रकाश निकम यांच्या अपेक्षा वाढल्या व त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली.पण विक्रमगड विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले.मात्र या मतदारसंघात भाजपचे हरिश्चंद्र भोये हे निवडून आले व निकम हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.अशी राजकीय स्थिती निर्माण झाली असताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्याना डोक्यावर घेतल्यामुळे शिंदे गट चांगलाच दुखावला आहे.ज्या सांबरे यांना भाजपचा विरोध आहे,त्यांना शिंदे गटाने आपल्या पक्षात सामावून घेणे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व आ.प्रवीण दरेकर या तिघांच्या पचनी पडले नाही व त्यांनी प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात सामावून घेत सूड उगवला.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीपर्यंत भाजपचा सूडाचा प्रवास असाच सुरू राहील,असा अंदाज आहे.

