दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
शिंदे गटाचा बालेकिल्ला उध्वस्त करण्यासाठी भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू,
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून फोडाफोडीच्या राजकारणाने चांगलाच वेग घेतला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या खेळीला प्राधान्य देण्यात येत आहे.निवडणुका जाहीर होण्यापूर्वी फोडाफोडीचे राजकारण करून राजकीय पक्षांना खिळखिळे करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.पालघर जिल्ह्यात अशाप्रकारची मोहीम सुरू झाली आहे.विरोधी पक्षासह मित्र पक्ष देखील त्यांच्या नजरेतून सुटलेले दिसत नाहीत.त्यांच्या या खेळीचा दणका मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला नुकताच बसला आहे.
काल पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) नंदकुमार पाटील,त्यांच्या पत्नी रेश्मा पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सारिका निकम,शिरगावचे घनश्याम मोरे,सरावलीचे सरपंच आनंद धोडी,पौर्णिमा धोडी, जव्हारचे माजी सभापती चंद्रकांत रंधा,युवासेना प्रमुख रिकी रत्नाकर,संघटक प्रकाश सांबर,सुधीर नम व सुधीर ओझरे,यांनी त्यांच्या उपस्थितीत काल भाजपात प्रवेश केला.या प्रवेश प्रसंगी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत, बाबाजी काठोळे व विवेक कलमाडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.पालघर जिल्हा परिषदेत पुन्हा शिंदे गटाचे वर्चस्व निर्माण होता कामा नये,यासाठी भाजप कामाला लागली आहे.वसई- विरार महानगरपालिका व पालघर जिल्हा परिषद,कोणत्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कंबर कसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.काल झालेल्या या कार्यक्रमानंतर वसई व विरार भागात ही प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू होणार असल्याचे संकेत,याच कार्यक्रमात मिळाले.गणेशोत्सव पार पडल्यानंतर साधारणपणे सप्टें.च्या दुसऱ्या आठवड्यात बहुजन विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते,भाजपच्या गळाला लागतील,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

