दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आता सुरू झालीय,श्रेयवादाची जीवघेणी लढाई…
वसई-विरारच्या नागरिकांचे सध्या कौतुक करावे,तेवढे थोडे आहे.कारण,या
उपप्रदेशातील जनता खूप सोशिक आहे.गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करत या उपप्रदेशातील लाखो कुटुंबे आपले जीणे जगत आले आहे.दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई,मरणप्राय वेदना देणारी वाहतूक कोंडी,अनधिकृत
फेरीवाल्यांचे पदपदावरील अतिक्रमण,अनधिकृत रिक्षा व्यवसाय व मनमानी पद्धतीने व्यवसाय करणारे मुजोर रिक्षाचालक,भ्रष्ट लोकप्रतिनिधी ( सत्ताधारी व विरोधक ) हप्तेवसुलीसाठी वखवखलेले पोलीस,अश्मयुगातील रस्त्यांना लाजवणारे खड्डे पडलेले रस्ते,अनधिकृत बांधकामाचा जीवघेणा सुळसुळाट,अनधिकृत बांधकामात सर्वसामान्य गरजूची होत असलेली फसवणूक,मड्याच्या टाळूवरील लोणी ओरबडणारे मनपाचे अधिकारी व ठेकेदार,या सगळ्यांना सहन करण्याची ऊर्जा वसईकर जनतेच्या ठायी ठायी आहे.ही ऊर्जा त्यांच्यामध्ये कुठून येते ? हा प्रश्न वर्षानुवर्षे अनुत्तरित आहे.
” नेमेची येतो पावसाळा,” या उक्तीनुसार गेल्या आठवड्यात वसईकर जनतेवर अस्मानी संकट कोसळले.यामध्ये अनेक कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले.आपल्या करदात्यांचे हाल पाहून तथाकथित स्वयंभू नेत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या,अनेक जण पाण्यात उतरले,कोणी अन्नपाकिटे वाटप करू लागला,कोणी ट्रॅक्टर मधून लोकांची ने – आण करू लागला,कोणी पाण्यात उभा राहून फोटोसेशन करू लागला.हे सारे वसईकरासाठी नवीन नव्हते,ते गेली अनेक वर्षे हे अनुभवत आले आहेत.हे सारे सहन करण्याशिवाय ते काहीच करू शकत नाहीत.वास्तविक तालुक्यातील चार महानगरे दरवर्षी पाण्याखाली का जातात ? या विषयी आपली जबाबदारी काय आहे,यावर विचारमंथन करण्याऐवजी मनपा अधिकारी व लोकप्रतिनिधी दरवर्षी अशी नौटंकी करण्यात धन्यता मानत आले आहेत.गेल्या काही वर्षात ज्या सरकारी जमिनी लुटल्या गेल्या त्या जर शाबूत राहिल्या असत्या तर ऐतिहासिक वसईचे सौंदर्य टिकून राहिले असते व नागरिक नक्कीच सुखावले असते.आता उपप्रदेशात साचलेले पावसाळी पाणी आता हळूहळू ओसरू लागले आहे,जनजीवन मूळ पदावर येऊ लागले आहे.पण आता श्रेयवादाची जीवघेणी लढाई सुरू झाली आहे,सत्ताधारी व विरोधक असा सामना रंगू लागला आहे.” सारं काही आम्हीच केले,” अशा बेडूक उड्या मारणारे स्वयंभू नेते आम्ही वसईकर सर्वत्र पाहतोय.सोशल मिडियावर सध्या सुरू असलेली श्रेयवादाची लढाई पाहून आम्ही सारे स्तब्ध झालो आहोत.ज्यानी आम्हाला अस्मानी संकटाच्या खाईत ढकललं,आज तेच लोक श्रेय उपटण्यासाठी धडपडत असल्याचे पाहायला मिळत आहे,हे खऱ्या अर्थाने तुमचे – आमचे दुर्देव आहे.

