दीपक मोहिते,
” युतीचा निर्णय अंगलट,”
बेस्ट निवडणूक ; मराठी मतदारानीही उद्धव / राज यांना झिडकारले,
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत युती करणाऱ्या शिवसेना ( उबाठा ) व मनसेचे चांगलेच पानिपत झाले.सत्तेच्या राजकारणात मतदार राज ठाकरे यांच्या पक्षाला थारा देत नाहीत,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.मराठी भाषिकांच्या अस्मितेला फुंकर मारत उद्धव व राज हे दोघे ठाकरे बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरले खरे,पण त्यांना बहुतांश मराठी मतदार असलेल्या बेस्टच्या कामगारांनी आपल्या पतपेढीत प्रवेश करू दिला नाही.
वेळोवेळी आपली राजकीय भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांचा हात हातात घेणाऱ्या उद्धव याना या निवडणुकीत जबर फटका बसला.गेले ९ वर्षे पतपेढी आपल्या ताब्यात राखणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मतदारांनी चांगलाच दणका दिला आहे.२१ जागा पैकी शशांक गटाने १४ जागा जिंकत उद्धव ठाकरे गटाकडून सत्ता हिसकावून घेतली तर प्रसाद लाड यांच्या गटाने ९ जागा जिंकल्या.प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांची सहकार समृद्धी पॅनेल,शिवसेनेच्या किरण पावसकर ( शिंदे गट ) यांचे राष्ट्रीय कर्मचारी सेना,नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना,बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनेल व ठाकरे बंधूंची उत्कर्ष पॅनेल,अशा एकूण पाच कामगार संघटना या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.पण शशांक राव यांच्या पॅनेलने ही निवडणूक एकहाती जिंकत इतर चार संघटनांना धूळ चारली.बहुचर्चित राज व उद्धव यांच्या युतीची पाटी कोरी राहिली.मुंबईत झालेला हा पराभव,या दोघांच्या जिव्हारी लागला आहे.या पराभवानंतर आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेतली.ही भेट विकासकामासंदर्भात होती,असा खुलासा स्वतः राज आता करू लागले आहेत.शहरातील पार्किंग व अन्य विकासकामे याविषयीचा आराखडा फडणवीस यांना सादर केल्याचा दावा राज यांनी केला आहे.या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले, पण त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही.या निवडणुकीच्या निकालावरून एक बाब स्पष्ट झाली,ती म्हणजे परप्रांती्यासोबत मराठी माणसे देखील मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता जवळ करण्यास तयार नाहीत.

