दीपक मोहिते,
मोठ्या संकटाची चाहूल,
भविष्यात आपला पण चेन्नई होऊ शकतो…
काही वर्षांपूर्वी एका दैनिकात आलेल्या वृत्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.निसर्गाने भविष्यात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे,हे स्पष्ट करणारे सदर वृत्त होते.निसर्गाची खोडी काढली तर काय होते,याचा अनुभव आता चेन्नईवासीयाना घ्यावा लागत आहे.भविष्यात अशीच स्थिती देशाच्या प्रत्येक शहरात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

मानवाच्या असंख्य चुका म्हणा किंवा ओरबाडून खाण्याची वृत्ती म्हणा,आज जगभरातील देश विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहे.वादळे,अतिवृष्टी,
महापूर,दरडी कोसळणे,इ.संकटाचा त्यामध्ये समावेश आहे.पण यामध्ये आता आणखी एका भीषण संकटाचा समावेश झाला आहे.चेन्नई शहरातील भूजल पातळी सुमारे २ हजार फुटाखाली गेली असून सरकारने शहरातील बोअरिंगद्वारे पाणी उपसा करण्यावर बंदी घातली होती.त्यामुळे त्याकाळी उन्हाळ्यात चेन्नई शहराला भीषण जलसंकटाला तोंड द्यावे लागते होते.या शहरात एरवी २०० फुटावर पाणी लागत असे.प्रचंड पाणी उपसा,सिमेंटचे रस्ते,त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया खंडित होत गेली.परिणामी भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत गेली आणि आज चेन्नईवासीय भीषण जलसंकटाचा सामना करत आहेत.

या संकटाची दाहकता लक्षात घेऊन सरकारने जनतेला आवाहन केले आहे की छतावरून कोसळणारे पावसाच्या पाण्याचे संचय करा,जेणेकरून उन्हाळयात काही अंशी उपाययोजना करणे शक्य होईल.चेन्नई शहरात गेल्या काही वर्षात सिमेंट-काँक्रीटचे रस्ते,टोलेजंग इमारतीचे बांधकाम,इ.विकासकामे करताना पावसाळी पाणी जमिनीत मुरण्याचे सर्व मार्ग बंद झाले.त्यामुळे हे जलसंकट उभे ठाकले आहे.ही परिस्थिती लक्षात घेता भविष्यात आपल्या सर्वाना एका भीषण संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
एकीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली असताना,दुसरीकडे उत्तरेत ग्लोबल वार्मिंगमुळे हिमालयात हिमनग वितळू लागले आहेत,त्यामुळे या भागातील राज्यांना पुराचा सामना करावा लागत आहे.एकीकडे पाणी नाही म्हणून जलसंकट,तर दुसरीकडे भरपूर पाणी,पण पुराच्या स्वरूपात.अशा दुहेरी संकटात संपूर्ण मानवजात सापडली आहे.
निसर्गाच्या कलाकृतीला नख लावले की हे असंच होणार,अजूनही वेळ गेलेली नाही.वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे पावलोपावली जाणवू लागले आहे.आपणच आपला घात करत आहोत,हे लक्षात घ्यायला हवे.प्राणी,वृक्ष व जल संवर्धन,याचे महत्व ओळखून आपल्या वागण्यात बदल करायला हवं,अन्यथा आपलाही चेन्नई होऊ शकतो.
हल्ली ग्रामीण भागात हे चित्र आवर्जून पहावयास मिळते,ते आजवर बदलण्याचे प्रयत्न झाले खरे,परंतु या प्रयत्नामध्ये प्रामाणिकपणा नव्हता.त्यामुळे आजही ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी अशी वणवण सुरूच आहे.ग्रामीण भागातील पाणीटंचाई संपुष्टात यावी,यासाठी अनेक योजना आल्या.हजारो कोटी रु.खर्च झाले परंतु परिस्थिती बदलली नाही.
ग्रामीण भागात डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे अब्जो द.ल.लि.पाणी दररोज वाया जात असते,ते पाणी अडवण्यासंदर्भात सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत.समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवले असते तर ग्रामीण भागाचा नक्कीच कायापालट होवू शकला असता.परंतु ” पाण्याची उपलब्धता व नियोजन,” या विषयाकड़े एकाही सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही.त्यामुळे स्वातंत्र्याच्या आठ दशकानंतरही ग्रामीण भागात पाणीटंचाईची दाहकता तुम्हा-आम्हाला सहन करावी लागत आहे.केवळ कुपनलिका खोदुन
टंचाईची दाहकता कमी होणार नाही,तर समुद्रात वाया जाणारे पाणी अडवणे व त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे,यावर भर देणे आवश्यक आहे.पाण्याचा उपसा हा आवश्यक असल्याचा दावा करणारे आपले राज्यकर्ते व मूठभर धन्नाशेठ यांच्या नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याच्या वृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने लगाम लावण्याची गरज आहे.

