दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आमचे संकटमोचक बाप्पा स्वतः भितीच्या सावटाखाली …
पालघर व ठाणे जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन आमचे बाप्पा सध्या खूप धास्तावले आहेत.भक्तांच्या घरी कसे पोहोचायचे ? अशा विवंचनेत ते सापडले आहेत.

गणेशोत्सव सणाच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आपल्या क्षेत्रात दरवर्षी आढावा बैठका घेत असतात.मात्र या सर्व बैठका केवळ एक औपचारिकता असते,अशा बैठकांमधून फारसे काही निष्पन्न होत नसते.या बैठकांमध्ये महसूल,पोलीस,महावितरण,सार्व.बांधकाम विभाग,अग्निशमन दल,आरोग्य व वैद्यकीय सेवा,आपत्कालीन यंत्रणा व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येत असते.पण गणेशोत्सव काळात या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे,हे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठे दिव्य असते.या काळात संबधित अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद असणे,हे सर्वसामान्याच्या पाचवीला पुजले आहे.तर दुसरीकडे बाप्पाचे आगमन सुरक्षितरित्या व्हावे,यासाठी महानगरपालिका रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची धडक मोहीम हाती घेते.पण या खड्ड्यात खडी व दगडी भरून जी लेव्हलिंग करण्यात येते,तीच अनेकदा बाप्पाच्या जीवावर उठत असते.अशा पद्धतीने खड्डे भरणे,हे ठेकेदार व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांचे खिसे भरणारे असते.पावसाळ्यापूर्वी होणारी बोगस नालेसफाई व बाप्पाच्या आगमनापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरणे,या दोन्ही बाबी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यामध्ये बोगसपणा व खिसे भरणे,असे समान सूत्र असते.वास्तविक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या महत्वाच्या कामावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुर्दाड अधिकारी व मुजोर ठेकेदार यांना बाप्पाचे आगमन व निर्गमन याच्याशी कोणतेही देणेघेणे नसते.आज या दोन्ही जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता,संकटमोचक अशी ओळख असलेले आमचे बाप्पा स्वतः भितीच्या सावटाखाली आले आहेत.

