दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मुंबईतील मराठी माणूस ; शरद पवारांचे पुतना मावशीचे प्रेम…
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी काल एक महत्वाचे वक्तव्य केले.त्यांचे हे वक्तव्य महत्वपूर्ण असले तरी त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.त्यांनी केलेल्या वक्तव्यावर एक नजर टाकली असता,पवार यांना ही उपरती आताच का व्हावी,असा प्रश्न मराठी माणसासमोर उभा ठाकतो.
काल ते म्हणाले,” मुंबईतील ४० – ५० मजली इमारतीमध्ये मराठी माणूस कुठेच दिसत नाही,” खरं आहे ते आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्यही आहे.पण त्याला कोण जबाबदार आहे,हे मात्र त्यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले नाही.यालाच आपण सोयीचे राजकारण असे म्हणतो.अशाप्रकारचे राजकारण करण्यात शरद पवार यांचा हात कोणी पकडू शकत नाही.टायमिंग व वक्तव्य,याची सांगड कशी घालायची ? हे शरद पवार यांच्या गुरुकुलातच शिकायला हवे.मराठी माणूस मुंबईतून कसा हद्दपार झाला.त्याला आपला बाडबिस्तरा गुंडाळून वसई – विरार,डोंबिवली – बदलापूरला का स्थलांतरित व्हावे लागले ? याविषयी पवार यांनी आत्मचिंतन केले पाहिजे.१९८४ च्या दरम्यान मुंबई शहरात अभूतपूर्व असा गिरण्यांचा संप सुरु झाला होता.गिरणी मालक संघाचा मुजोरपणा व राज्यकर्त्यांचा करंटेपणा यांची या संपात अभद्र युती झाली व गिरणी कामगारांच्या आपल्या कुटुंबाची उपासमारी टळावी,यासाठी चाळीतील आपली घरे विकण्यास सुरुवात केली.येथूनच मराठी माणसाच्या हालअपेष्टा सुरू झाल्या. मालक व राज्यकर्ते,या दोघांमध्ये झालेली अभद्र युती गिरणी कामगार नेते डॉ.दत्ता सामंत यांच्या लक्षात आली नाही आणि संप लांबत गेला,त्यामुळे गिरणी कामगाराचा धीर सुटत गेला.अनेक गिरणी कामगारांनी आपापली मूळ गावे गाठली तर उर्वरित मराठी माणसाने आपली घरेदारे विकून ६० कि.मी.अंतरावर असलेले वसई – विरार व डोंबिवली – बदलापूर गाठण्यास सुरूवात केली व अवघ्या आठ ते दहा वर्षात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला.मराठी माणसाची अशाप्रकारे वाताहत होत असताना सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व जाणता राजा म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या शरद पवार या दोघानी बघ्याची भूमिका घेतली.कालांतराने गिरणी मालकांनी गिरणीच्या जमिनीवर असलेल्या कामगारांच्या वसाहती रिकाम्या करण्याचा सपाटा लावला.वास्तविक या दोघांनी त्यावेळी सरकारचे कामगारविरोधी धोरण व गिरणी मालकांच्या आदमुठेपणाविरोधात दंड थोपटले असते तर आज मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार व्हावे लागले नसते.पण त्यावेळी या दोघा नेत्यानी गिरणी मालकांसमोर कच खाल्ली.आज गिरणी संपाला ४० वर्षे पूर्ण झाली पण संप चालूच आहे.अद्याप तो मागे घेण्यात आलेला नाही.त्यावेळी संपात सरकार व या दोघांनी एकत्र येऊन गिरणी मालकांच्या नाकदुऱ्या काढल्या असत्या तर आज टोलेजंग इमारतीमध्ये मराठी माणूस पाहायला मिळाला असता पण या सर्वांचे सोयीचे राजकारण हे मराठी माणसाच्या मुळावर आले व सर्वसामान्य मराठी माणसे देशोधडीला लागले.आज शरद पवार हे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गळे काढू लागले आहेत.पण त्यांचे हे पुतना मावशीचे प्रेम आहे,हे मराठी माणूस चांगलाच ओळखून आहे.

