दीपक मोहिते,
कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक होतात तेंव्हा…
पोलीस यंत्रणा दिवसेंदिवस मुर्दाड बनत चालली आहे…
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ताब्यात घेतलेल्या एका आंदोलकास धावत जाऊन लाथ घातल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाली.त्यानंतर राज्यात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.नव्याने अंमलात येणाऱ्या जनसुरक्षा कायद्याची ही पहिली झलक असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
उपअधीक्षक कुलकर्णी याने ज्या आंदोलनकर्त्याच्या कंबरेत पाठीमागून धावत येऊन लाथ घातली,त्या इसमाचे गोपाल चौधरी असे नाव असून कौटुंबिक प्रकरणात न्यायासाठी त्याचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते.आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून स्वातंत्र्यदिनी आपण जिल्हाधिकारी न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देणारे पत्र त्यांनी पोलिसांना दिले होते.स्वातंत्र्यदिनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.त्यानंतर त्यास पोलीस घेऊन जात असताना पोलीस उपअधीक्षक यांनी पाठमागून धावत येऊन त्याच्या कंबरेत लाथ घातली.आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल पडल्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा नोंदवला.येथपर्यंत सर्व काही व्यवस्थित होते,पण पाठीमागून धावत येऊन उपअधीक्षक कुलकर्णी याने त्या व्यक्तीच्या कंबरेत लाथ घालणे,ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी होती.त्याला कायद्यानुसार शिक्षा व्हावी,याविषयी कोणाचे दुमत नाही.पण,स्वतःला कायद्याचे रक्षक म्हणवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे हे वागणे न्यायाला धरून नव्हते,उच्चपदस्थ अधिकारी जर असे रानटीपणाने वागू लागले तर आपल्या राज्याची वाटचाल ” जंगलराज,”च्या दिशेने सुरू झाली आहे,असे मानायला हरकत नाही.पोलीस कसे वागतात,हे आजवर पोलीस कोठडीत अनेक आरोपींच्या झालेल्या हत्या,बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीचे झालेले एन्काऊंटर व अहिल्यानागर येथे पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाणीमुळे सूर्यवंशी तरुणाची झालेली हत्या,या सर्व घटना पाहता पोलीस आता ” रक्षक नव्हे तर भक्षक,” होऊ लागले आहेत,हेच स्पष्ट होत आहे.या अशा घटनांमुळे जनसुरक्षा कायदा अमलात आला की काय होणार आहे ? याची चुणूक यानिमित्ताने मिळू लागली आहे.गृहमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे हे अपयश असून त्यांचे आपल्या गृहविभागावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे.ज्या पोलिसांचे फडणवीस गुणगान गात असतात,ते पोलीस असे अमानुषपणे वागू लागले तर गुन्हेगारीला लगाम बसण्याऐवजी त्याला बळ मिळण्याची भिती आहे.

