दीपक मोहिते,
” करदात्याच्या पैश्याची लूट,”
वसई विरार शहर मनपा ; नालेसफाई व कचरा उचलणे,या दोन्ही कामाची ईडीने चौकशी करावी…
वसई विरार शहर महानगरपालिकेचा भ्रष्ट माजी आयुक्त हा सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.४१ अनधिकृत इमारती बांधकाम,वसुली व त्याच्याकडे सापडलेली गडगंज संपत्ती,या अशा तीन प्रकरणी हा माजी आयुक्त व त्याचे कुटुंब सध्या अडचणीत आले आहेत.न्यायालयाने त्यांच्यासह अन्य चार जणांना २० ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी सुनावली आहे.

त्याच्या या चौकशीची कार्यकक्षा कोणकोणत्या विभागापर्यंत विस्तारल्या आहेत,ते यथावकाश म्हणजे आज ना उद्या माध्यमांना कळू शकेल.सध्या सुरू असलेल्या चौकशीमध्ये कचरा व्यवस्थापन व नालेसफाई,या दोन ज्वलंत प्रश्नाचा समावेश आहे की नाही,हे आजच्या घडीला कळायला मार्ग नाही.हे दोन्ही विषय मनपा अधिकारी,ठेकेदार,
लोकप्रतिनिधी व विविध प्रभाग समितीचे प्रभारी सहा.आयुक्त यांच्यासाठी एकप्रकारे पर्वणी असते.नालेसफाईची कामे किती बोगस असतात,तसेच कचरा उचलणे व रस्ते सफाईच्या कामावर किती मजूरांची कागदोपत्री मंजुरी असते व प्रत्यक्ष किती मजूर कामावर असतात ? हा ईडीसाठी संशोधनाचा विषय आहे.या दोन्ही कामाची कसून चौकशी झाल्यास बोफोर्स व राफेल खरेदीच्या धर्तीवर या महानगरपालिकेचा महा आर्थिक घोटाळ्याचा पर्दापाश होऊ शकेल.या गोरखधंद्यामध्ये भाजपचा मुंबईतील एक वरिष्ठ नेताही सामील आहे.या नेत्याला बेनामी ठेका कसा मिळाला,याच्या सुरस कथा महानगरपालिकेच्या आवारात नेहमीच कानावर पडत असतात.

नालेसफाई व कचरा उचलणे या दोन कामातील भ्रष्टाचार शोधून काढणे,अत्यंत कठीण असते,कारण या कामातील गैरप्रकाराचे पुरावे गोळा करणे शक्य होत नाही.या दोन्ही कामाच्या निविदा मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधी व ठेकेदार आपले सर्वस्व पणाला लावत असतात.कामे न करताही कामाची भरमसाठ बिले अधिकाऱ्यांच्या संगनमताने निघत असतात.यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी,लेखाधिकारी व त्यांचा स्टाफ हे ” आम्ही सर्व भाऊ भाऊ,एकत्र येवून धुवून पुसून खाऊ,” असा अजेंडा राबवत असतात.गेल्या पंधरा वर्षात या दोन्ही कामावर किती पैसा खर्ची पडला व किती कामे झाली ? याची ईडीने चौकशी केली किंवा हे ठेके घेणाऱ्यांची बँक खाती तपासल्यास यातील “अलिबाबा आणि ४० चोर,” नक्कीच गजाआड जाऊ शकतील.नालेसफाईची कामे मिळवण्यासाठी काही मूठभर पत्रकार,ठेकेदार व लोकप्रतिनिधी कसे एकमेकांच्या उरावर बसतात,हे जर पहायचे झाल्यास ईडीच्या पथकाने महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धाड टाकली पाहीजे.तसेच यांची चौकशी करताना अधिकाऱ्यांनी थर्डडिग्रीचा वापर केल्यास हे सगळे पोपटासारखे बोलू लागतील.

