दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अखेर त्या २९ गावांचा तिढा सुटला…
काल अखेर राज्याच्या नगरविकास विभागाने वसई तालुक्यातील २९ गावांचा तिढा मार्गी लावला.ही गावे महानगरपालिकेतच राहणार असल्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.त्यामुळे गेली पंधरा वर्षे वादात अडकलेल्या प्रश्नाचा एकदाचा सोक्षमोक्ष लागला आहे.गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या मूठभर लोकांची तोंडे आता बंद झाली आहेत.
राज्य शासनाने आपल्याला असलेल्या अधिकाराचा वापर करून गेल्या २४ फेब्रु.२०२४ रोजी या विषयावर अधिसूचना प्रसिद्ध केली व नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या.त्या सूचना व हरकतीवर कोकण विभागीय आयुक्तांनी नुकतीच सुनावणी घेतली व आपला अहवाल नगरविकास विभागाला सादर केला होता.सदर अहवाल विचारात घेऊन राज्य सरकारने ही २९ गावे महानगरपालिकेतच ठेवण्यास मंजुरी दिली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे वगळण्यात आलेल्या गावाच्या विकासाला वेग येणार आहे.राज्य सरकारच्या या निर्णयाचे या सर्व गावातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.राज्य सरकारच्या या निर्णयानुसार आगाशी, कोफराड,ससूनवघर,
वाघोली,भुईगाव खु.भुईगाव बु.गास,गिरीज,कौलार खु.कौलार बु.नवाळे,निर्मळ,वटार,चांदीप,काशिद कोपर,दहिसर,कसराळी, कोशिंबे,चिंचोटी,देवदळ,
कामण,कोलही,कण्हेर,
मांडवी,शिरसाड,सालोली,राजोडी,या गावांचा त्यामध्ये समावेश आहे.या सर्व गावात ग्रामपंचायती असताना भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत.घरपट्टी व शासकीय अनुदाने,असे दोनच आर्थिक स्रोत उपलब्ध असायचे,त्यामुळे या सर्व गावांचा विकासाचा वेग मंदावला होता.पण महानगरपालिकेने न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही या गावाच्या विकासाला चांगलाच हातभार लावला होता.तरीदेखील विकासकामे करताना मर्यादा येत होत्या.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता ही सर्व गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील,अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

