दीपक मोहिते,
जाज्वल्य देशाभिमानच देशाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतो…
आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.स्वातंत्र्याच्या आठ दशकात आपल्या देशाची झालेली वाटचाल वाखणण्याजोगी नसली तरी समाधानकारक आहे.सुरुवातीच्या काळात अनेक आघाडीवर बलाढ्य देशानी आपली कोंडी केली.अन्न-धान्य,संरक्षण,परराष्ट्र धोरण,शिक्षण,आरोग्य व आर्थिक धोरण इ.क्षेत्रात मागासलेपणा होता.परंतु आता तशी स्थिती राहिलेली नाही.वरील सर्व क्षेत्रात आता आपण स्वंयपूर्ण झालो आहोत,ही अभिमानाची बाब असून प्रत्येक भारतीयाने आज आपल्या तिरंग्याला सलाम करायलाच हवा.अठरापगड़ जाती-जमाती,विविध भाषा व संस्कृती,प्रचंड लोकसंख्या असलेला लोकशाहीप्रधान देश,अशी आपली जगभरात ओळख आहे.हे सारे एकसंघ ठेवून राज्यकारभार चालवण्याची किमया आपल्या राज्यकर्त्यानी यशस्वीरित्या करून दाखवली,याची नोंद घ्यायलाच हवी.
गेल्या ७९ व्या वर्षात देश विकसनशील देशाच्या रांगेत सामील झाला,जगभरात आता आपली दखल घेण्यात येवू लागली आहे.या प्रदीर्घ कालखंडात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण वेगळा ठसा उमटवु शकलो.आशिया खंडात आज आपण चीनसोबत स्पर्धेत आहोत.भारतीय बाजारपेठ,हा चीनचा आर्थिक कणा आहे.आशिया खंडात अशी बाजारपेठ कोणत्याही देशात नाही.त्यामुळे चीनचा ड्रैगन कितीही गुरगुरला,तरी त्यास आपल्या मर्यादा ठाऊक आहेत.सन १९९० पर्यन्त आपले परराष्ट्र धोरण हे रशियाच्या बाजूने झुकलेले होते,परंतु गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले व रशियामध्ये बदलाचे वारे वाहु लागले.सोव्हियत संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियातून अनेक देश फुटून बाहेर पडले,महासत्ता म्हणून ओळखला जाणारा रशिया कमकुवत झाला.दुसरीकडे अमेरिका,भारताला कोंडीत पकडण्यासाठी आपल्या शत्रुराष्ट्राना रसद पुरवत होता.उत्तरेस चीन व पाकिस्तान,पूर्वेस बांगला देश,नेपाळ व दक्षिणेस श्रीलंका असे रिंगणच तयार झाले.नेपाळ हा अन्न-धान्य व आर्थिक बाबींमध्ये आपल्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांचा विरोध तेवढा तीव्र:स्वरूपाचा नव्हता.श्रीलंकेत लिट्टेने हैदोस घातला होता,त्यास आवर घालण्यासाठी श्रीलंकेने अमेरिकेला साकडे घातले व अमेरिकेने त्वरित हालचाल करून इस्रायलला पाचारण केले.परंतु तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यानी श्रीलंकेला लष्करी मदत दिली व आपले सैन्य शांती दल म्हणून त्या देशात पाठवले.राजीव गांधीनी देशहितासाठी घेतलेला हा निर्णय त्यांच्या जीवावर उठला.त्याकाळी इस्त्रायलशी आपले राजनैतिक संबध नव्हते.त्यामुळे अमेरिका,हा इस्रायलने श्रीलंकेत आपला नाविक तळ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील होता.दक्षिणेकडे आणखी एका शत्रुराष्ट्राला पाय रोवता येवू नये,म्हणून राजीव गांधी यांच्या सरकारने निर्णय घेत lला होता.
आज आठ दशकानंतर आपण सर्व क्षेत्रात सक्षम आहोत,परंतु अजूनही आर्थिक,सामाजिक,ग्रामीण शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आपण भक्कमपणे पाय रोवू शकलेलो नाही.आन्तरराष्ट्रीय बाजारात रु.ची सतत घसरण सुरु आहे.सतत होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरुन घसरत चालली आहे,नोटाबंदीचा फायदा होण्याऐवजी सर्वसामान्यजनाना फटका बसला,परकीय गुंतवणुकीच्या आघाडीवर स्मशान शांतता आहे,औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेली मंदी,कमी होण्याचे नाव घेत नाही,सीमेवर शत्रुराष्ट्राच्या कुरापती सतत वाढत आहेत,शहीद होणाऱ्या जवानाची संख्या चढत्या भाजणीवर आरुढ झाली आहे,नोकरशाहीवर अंकुश नसल्यामुळे ती बेलगाम झाली आहे,धार्मिक व जातीय तेढ सतत वाढत आहे,ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आपली वाटचाल पुन्हा अश्मयुगाच्या दिशेने होत नाही ना ? अशा शंकेची पाल मनात चुकचुकु लागली आहे.केवळ निवडणुका जिंकून आपण देशाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकत नाही,तर जाज्वल्य देशाभिमानच या देशाला तारु शकते.पण आपल्या विद्यमान राज्यकर्त्यांना सांगणार कोण ?

