दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी,
मुंबईलगत असलेल्या गुजरातच्या प्रवेशद्वारावर वसलेला पालघर जिल्हा हा निसर्गाच्या लेण्यानी नटलेला असा हा जिल्हा आहे.पुर्वेस खोलडोंगरदऱ्या,विपुल वनसंपदा व भातशेतीची आगरे दुसरीकडे पश्चिमेस अथांग समुद्रकिनारा,बागायती,
फुलशेती व पारंपारीक पद्धतीने मासेमारी करणारी समुद्रकिनारी वसलेली मच्छीमारांची असंख्य गावे.शहरीकरण होवुनही या संपूर्ण परिसराने आजही आपले गावपण टिकवून ठेवले आहे.वास्तविक येथील वातावरण हे पर्यटन उद्योगाला पोषक असूनही राज्य व केंद्र सरकार त्याकडे का दुर्लक्ष करत आहे,याचा उलगडा होत नाही.
जिल्ह्याच्या पश्चिमेस वसई ते थेट डहाणू व पूर्वेस मनोर,विक्रमगड़,जव्हार,मोखाडा परिसर हा पर्यटनासाठी उत्तम असा प्रदेश आहे.जव्हार तालुका हा मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जातो. हा तालुका पर्यटनासाठी पोषक असा तालुका असुन येथील हवामान थंड आहे.हा प्रदेश पर्यटनासाठी योग्य असुन सरकार या भागात पर्यटनवाढीसाठी अनुकूल असल्याचे या भागात आलेल्या प्रत्येक मंत्र्यांने तोंडभरून आश्वासने दिली. पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात या भागात बांधकामे वाढत गेली. एकेकाळी हिरवेगार असलेला हा तालुका सिमेंटचे जंगल झाला आहे.आज या तालूक्याचे सौंदर्य हरवत चालले आहे,त्यास सरकारची उदासीनता कारणीभूत ठरली आहे.
वसई,अर्नाळा,शिरगाव व डहाणू किल्ले,केळवे – माहीम परिसराचा निसर्गसुंदर समुद्रकिनारा,चिंचणी,बोर्डी व डहाणू येथील रम्य परिसर,पुरातन मंदिरे,जव्हार येथील राजवाड़ा,वसईच्या सीमेवर वसलेली वज्रेश्वरीदेवी व ट्रैकिंगसाठी विपुल प्रमाणात असलेले डोंगर कडे इ.महत्वाचे परिसर पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरले आहेत.दर आठवड्याला हजारो पर्यटक समुद्रकिनारी मौजमजा लुटण्यासाठी येत असतात पर्यटनासोबत देवदर्शन असा दुहेरी आनंद त्याना लूटता येतो तर पूर्व भागातील डोंगरदऱ्या कपारी,पायी तुडवणे,कड़े पादांक्रात करणे यावर तरुणाईचा भर असतो.परंतु हा आनंद लूटत असताना पर्यटनाच्या सोई-सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकाना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते.जिल्ह्यातील या परिसराला पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास अनेक व्यवसाय निर्माण होवून पर्यटक या परिसराकडे अधिक आकर्षित होतील,तसेच स्थानिकाना रोजगार उपलब्ध होवू शकतो.गेल्या काही वर्षापासून येथील रिसोर्ट व्यवसायिक हे शासनस्तरावर प्रयत्नशील आहेत,राज्यसरकारनेही या प्रश्नी सकारात्मक दृष्टीकोन स्विकारला आहे,परंतु घोड़े पुढे का सरकत नाही,याचा उलगडा मात्र होत नाही.जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील मंदी व बेरोजगारीचा प्रश्न लक्षात घेवून राज्य शासनाने विनाविलंब या महत्वाच्या कामाला चालना देणे गरजेचे आहे.

